टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यासाठी पाच जणांचे अर्ज

टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यासाठी बीसीसीआयकडे सहा जणांनी अर्ज केले आहेत.

Updated: Jun 20, 2017, 08:45 PM IST
टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यासाठी पाच जणांचे अर्ज  title=

मुंबई : टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यासाठी बीसीसीआयकडे सहा जणांनी अर्ज केले आहेत. यामध्ये चार भारतीय तर दोन परदेशी खेळाडू आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, अफगाणिस्तानचे प्रशिक्षक लालचंद राजपूत आणि गगन खोडा यांनी अर्ज केले आहेत.

परदेशी खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी ऑल राऊंडर आणि आयपीएलच्या सनरायजर्स हैदराबादचे कोच टॉम मूडी तसंच इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू रिचर्ड पायबस यांनीही बीसीसीआयकडे अर्ज केला आहे.  या पाच इच्छुकांची सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांची समिती मुलाखत घेईल आणि त्यानंतर टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची निवड होईल.

अनिल कुंबळेचा राजीनामा

टीम इंडियाचा प्रशिक्षक अनिल कुंबळेनं राजीनामा दिला आहे. कॅप्टन विराट कोहलीबरोबरच्या वादामुळे कुंबळेनं राजीनामा दिल्याची चर्चा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर अनिल कुंबळेचा करार संपला होता पण आता प्रशिक्षक म्हणून राहायचं नसल्याचं कुंबळेनं बीसीसीआयला सांगितलं आहे.

करार संपल्यानंतरही कुंबळेला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कोच म्हणून कायम ठेवण्यात आलं होतं पण अनिल कुंबळे आयसीसीच्या बैठकीसाठी लंडनमध्येच थांबला. आयसीसीच्या बैठकीसाठी कुंबळे मागे थांबल्याचे अधिकृतरित्या सांगण्यात आले आहे.

भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक असलेला अनिल कुंबळे आयसीसीच्या क्रिकेट कमिटीचा सदस्य आहे. आयसीसीची वार्षिक सभा सोमवासपासून सुरू झाली असून, ही बैठक २३ जूनपर्यंत चालणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिजमधील मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेला २३ जूनपासून सुरुवात होत आहे.