IND vs AUS: दुसरी वन डे 'या' खेळाडूंसाठी शेवटची संधी, वर्ल्ड कपमधलं स्थानही धोक्यात

IND vs AUS 2nd ODI: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने एक-शुन्य अशी आघाडी घेतली आहे. आता रविवारी दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने पहिला सामना जिंकला असला तरी काही खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

राजीव कासले | Updated: Sep 23, 2023, 06:00 PM IST
IND vs AUS: दुसरी वन डे 'या' खेळाडूंसाठी शेवटची संधी, वर्ल्ड कपमधलं स्थानही धोक्यात title=

India vs Australia 2nd ODI: आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेआधी भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. यातला पहिला एकदिवसीय सामना जिंकत टीम इंडियाने (Team India) एक-शुन्य अशी आघाडी घेतली आहे. आता भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानचा दुसरा एकदिवसीय सामना रविवारी म्हणजे 24 सप्टेंबरला इंदौरच्या होळकर क्रिकेट स्टेडिअमवर (Holkar Cricket Stadium) खेळवला जाणार आहे. हा सामना टीम इंडियातल्या दोन खेळाडूंसाठी महत्त्वाचा असणार आहे. पहिल्या सामन्यात हे दोन्ही खेळाडू अपयशी ठरले होते. आगामी विश्वचषकापूर्वी या दोनही खेळाडूंना आपली कामगिरी सुधारावी लागणार आहे. 

या खेळाडूंवर नजर
मोहालीच्या फलंदाजीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर श्रेयस अय्यर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. एशिया कप स्पर्धेतही श्रेयस अय्यर केवळ एक सामना खेळू शकला होता. दुखापतीतून सावरल्यानंतर श्रेयस अय्यरने टीम इंडियात पुनरागमन केलं. एशिया कपसाठीच्या भारतीय संघात अय्यरला संधी देण्यात आली. पण तो केवळ एकच सामना खेळू शकला. दुखापतीमुळे पुढचा एकही सामन्यात तो खेळला नाही. यानंतरही विश्वचषकसाठीच्या भारतीय संघात त्याला संधी देण्यात आली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अय्यर केवळ आठ चेंडू खेळला आणि रनआऊट झाला. पण आता पुढच्या दोन्ही सामन्यात त्याला स्वत:ला सिद्ध करावं लागणार आहे. 

या यादीतला दुसरा खेळाडू म्हणजे अनुभव दिग्गज फिरकी गोलंदाज आर अश्विन. अश्विनकडे प्रचंड अनुभव आहे. मधल्या षटकात फलंदाजाला रोखून धरण्यात अश्विन माहिर आहे. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याचा म्हणावा तसा प्रभाव पाहिला मिळाला नाही. मोहालाची खेळपट्टी सपाट असल्याने चेंडूला जास्त टर्न मिळत नव्हता. ऑस्ट्रेलियन फलंदाज अश्विनची गोलंदाजी सहज खेळताना दिसत होते. अक्षर पटेल दुखापतग्रस्त असल्याने विश्वचषक स्पर्धेत अश्विनला संघात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण या स्पर्धेत वॉशिंग्टन सुंदरदेखील आहे. वॉशिंग्टन सुंदर संधी मिळाल्यास अश्विनला बाहेर बसावं लागेल. 

त्यामुळे वर्ल्ड कपसाठी खेळायचं असल्याचं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पुढच्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यर आणि आर अश्विनच्या कामगिरीवर लक्ष असेल. 

दुसऱ्या एकदिवसी सामन्यासाठी भारतीय संघ
 केएल राहुल (कर्णधार), रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड़, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, शार्दुल ठाकुर, वॉशिंगटन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज , प्रसिद्ध कृष्णा.