India vs Australia 3rd Test : विराट उवाच, आता थांबणे नाही...

मला संपूर्ण संघाचा अभिमान वाटतो

Updated: Dec 30, 2018, 10:48 AM IST
India vs Australia 3rd Test : विराट उवाच, आता थांबणे नाही...  title=

मुंबई : मेलबर्न कसोटीमध्ये भारतीय संघाने १३७ धावांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर कर्णधार विराट करोहलीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. इशांत शर्माने तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा दहावा गडी बाद केला आणि विराट कोहलीने मोठ्या उत्साहात विजयोत्सवाला सुरुवात केली. 

सामन्यानंतर या विजयाबद्दल आपला आनंद व्यक्त करत, विराटने आम्ही इथवरच थांबणार नाही, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली. हा विजय महत्त्वाचा आहेच. पण, आम्ही सारे इथेच न थांबता सिडनी येथील कसोटी सामन्यातही तितक्याच चांगल्या खेळाचं प्रदर्शन करु, असं तो म्हणाला. अखेरचा कसोटी सामना जिंकत मालिकाही खिशात टाकण्याचा आपला मनसुबा असल्याचं सांगत, त्याने यावेळी आपला संघ येणाऱ्य़ा प्रत्येक आव्हानासाठी सज्ज असल्याचं स्पष्ट केलं. 

पहिल्या डावानंतर भारताची धावसंख्या चांगली असतानाही विराटने फॉलो ऑन जाहीर का केला नाही, असा प्रश्न अनेकांनीच उपस्थित केला होता. पण, 'या साऱ्या चर्चांकडे मी फार लक्ष दिलं नाही', असंच विराट म्हणाला. 'दुसरा डाव खेळून धावसंख्येत भर घालावी हेच आमचं लक्ष्य होतं, आणि काही प्रमाणात ते साध्यही झालं', असं म्हणत त्याने आपल्या संघाच्या कामगिरीचं कौतुक केलं. 

तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये गोलंजादांचा अफलातून खेळ पाहायला मिळाला, ज्यामुळेच ऑस्ट्रेलियाला निर्धारित धावसंख्या करण्यापासून रोखता आलं, याच्याशी खुद्द विराटही सहमत आहे. जसप्रीत बुमराह आणि इतर गोलंदाजांचीही त्याने प्रशंसा केली. कर्णधार म्हणून मला माझ्या संघाचा प्रचंड अभिमान वाटतो असं म्हणत विराटने या विजयाचा आनंद साजरा केला.