IPL 2024 : लखनऊ सुपरजाएंट्सला मोठा धक्का! 'हा' वेगवान गोलंदाज आयपीएलमधून बाहेर?

IPL 2024 update : आयपीएल 2024 च्या 21 व्या सामन्यात लखनऊला मोठा धक्का बसलाय, टीमचा वेगवान गोलंदाज गुजरात टायटन्सविरूद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना जखमी झाला आहे.

Updated: Apr 8, 2024, 05:04 PM IST
IPL 2024 : लखनऊ सुपरजाएंट्सला मोठा धक्का! 'हा' वेगवान गोलंदाज आयपीएलमधून बाहेर? title=

IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 21 व्या सामन्यात लखनऊ सुपर जाएंट्स आणि गुजरात टायटन्समधील झालेल्या सामन्यात LSG साठी वाईट बातमी समोर आली आहे. लखनऊचा वेगवान गोलंदाज 'मयंक यादव' हा गुजरात टायटन्सविरूद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना जखमी झालाय, मयंकने या सामन्यात फक्त एकच ओव्हर टाकली यानंतर तो टीमच्या फिजिओसोबत मैदानाच्या बाहेर गेला होता. आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत मयंक यादवने फक्त 3 मॅचेस खेळल्या आहेत, अजून अर्ध्यापेक्षा जास्त सामने बाकी असल्याने लखनऊची चिंता वाढली आहे. त्यामुळे आता मयंक पुन्हा मैदानात उतरणार का? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.

लखनऊचा 'स्पीड स्टार' जखमी

लखनऊ सुपर जाएंट्स संघाचे अजून आयपीएल 2024 मध्ये एकूण 10 सामने बाकी आहेत, यामुळे मध्यातच टीमचा इन फॉर्म गोलंदाज जखमी झाल्याने लखनऊच्या प्लेअर्सची आणि फॅन्सची चिंता वाढलीये. मयंक यादव हा लखनऊ संघाचा अति महत्वाचा गोलंदाज आहे, कारण त्याने केवळ 3 सामन्यात 6 विकेट्स घेतले आहेत, त्याच्या 150 किमी/ताशी हून अधिकच्या वेगामुळे सारे फलंदाज मयंकच्या बॉलिंगला त्रस्त झाले होते. अशातच मयंक यादव हा आयपीएल 2024 चे पुढील सामने खेळणार की नाही? यावर अजून कोणत्याही प्रकारची अपडेट टीमकडून मिळालेली नाही.

रणजी ट्रॉफीमध्ये पण मयंक यादव अनेकदा घोटा आणि हॅमस्ट्रींगच्या दुखापतीला सामोरे गेला होता, तशाच पद्धतीने या आयपीएलमध्ये पण मयंक यादवच्या हॅमस्ट्रींगमध्ये दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला सामना अर्ध्यातच सोडून मैदानाबाहेर जावं लागलं होतं, यानंतर मयंक परत मैदानावर परत गोलंदाजीसाठी आला नव्हता. पण गुजरातविरूद्धच्या सामन्यात मयंक यादव जरी उपलब्ध नव्हता तरी लखनऊचा दुसरा युवा गोलंदाज यश ठाकुरने गुजरात टायटन्सच्या फलंदाजांचा चांगलाच कस काढला आणि या सामन्यात पाच विकेट्स घेण्याचा कारनामा करून लखनऊला हा सामना एकतर्फी जिंकवला.

लखनऊचा सलग तिसरा विजय

लखनऊ सुपर जाएंटसने आयपीएलच्या 21 व्या सामन्यात गुजरातला 33 धावांनी परभूत केलं आहे. या विजयात लखनऊकडून मार्कस स्टॉयनिस याने 58 धावांची दमदार खेळी खेळून टीमला एका चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवलं होतं, यानंतर गोलंदाजीत यश ठाकूरने आपला पराक्रम दाखवत गुजरातच्या अर्ध्या संघाला तंबूत परत पाठवले होते. या दमदार प्रदर्शनामुळे लखनऊने गुजरातविरूद्ध एक सोपा सामना जिंकला आहे.