IPL 2020 : सहाव्यांदा मुंबईच्या संघाची Final मध्ये धडक

जसप्रीत बुमराह ठरला विजयाचा हिरो...   

Updated: Nov 6, 2020, 06:38 AM IST
IPL 2020 : सहाव्यांदा मुंबईच्या संघाची Final मध्ये धडक  title=

मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातही विजयी पताका रोवण्यासाठी मुंबईच्या संघानं त्याच रोखानं प्रवास सुरु केला आहे. IPL 2020 मधील पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबईच्या संघानं दिल्लीचा पराभव करत स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. मुंबईच्या संघानं दिल्लीचा ५७ धावांनी पराभव केला. 

चार गडी बाद करत आपल्या गोलंदाजीनं विरोधी संघात दहशत निर्माण करणारा जसप्रीत बुमराह यावेळी विजयाचा खरा हिरो ठरला. शिवाय त्यानं या सामन्यात काही विक्रमही रचल्याचं पाहायला मिळालं. 

दिल्लीच्या संघाविरोधात केली सर्वोत्कृष्ट गोलंदाजी 

आयपीएलच्या १३ व्या हंगामामध्ये सुरुवातीपासूनच गोलंदाजीच्या क्षेत्रात धमाकेदार कामगिरी करणाऱ्या जसप्रीत बुमहगार यानं आपल्या कामगिरीमध्ये दिल्लीविरोधातील सामन्यातही सातत्य राखलं. त्याच्या गोलंदाजीच्या बळावर दिल्लीच्या संघातील फलंदाजांचा डाव गडगडला. 

 

शिखर धवन, श्रेयस अय्यर, मार्क्स स्टोइनिस आणि डॅनियल सॅम्स यांना बाद करत त्यानं दिल्लीच्या संघात दहशत निर्माण केली. सामन्यात ४ षटकं टाकणाऱ्या बुमराहनं यामध्ये १ मेडन षटक, १४ धावा देत ४ गडी बाद केले. ४-१४ हे त्याचं आतापर्यंतचं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन ठरत आहे. 

भुवनेश्वर कुमारचा विक्रम मोडला 

आयपीएलच्या कोणत्याही हंगामात सर्वाधिक २७ गडी बाद करणाऱ्या भारतीय खेळाडूचा विक्रमही बुमराहनं त्याच्या नावे केला. यापूर्वी २०१७ मध्ये हैदराबादच्या संघातून खेळणाऱ्या भुवनेश्वर कुमारनं २६ गडी बाद करत हा विक्रम आपल्या नावे केला होता.