विराट कोहलीचं झुंजार शतक, टेस्टमध्ये भारताचा कमबॅक

विराट कोहलीच्या झुंजार शतकामुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारतानं कमबॅक केलं आहे.

Updated: Aug 2, 2018, 10:45 PM IST
विराट कोहलीचं झुंजार शतक, टेस्टमध्ये भारताचा कमबॅक title=

बर्मिंगहम : विराट कोहलीच्या झुंजार शतकामुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारतानं कमबॅक केलं आहे. २७४ रनवर भारतीय टीम ऑल आऊट झाली आहे. यामुळे इंग्लंडला १३ रनची आघाडी मिळाली आहे. विराट कोहलीनं तळाच्या बॅट्मनसोबत छोट्या पण महत्त्वाच्या पार्टनरशीप केल्यामुळे ही आघाडी एवढी कमीपर्यंत आली आहे. विराट कोहलीनं २२५ बॉलमध्ये १४९ रनची खेळी केली. यामध्ये २२ फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. कसोटी कारकिर्दीमधलं विराटचं हे २२वं शतक आहे. एकीकडे विराट कोहलीचा संघर्ष सुरु असताना भारतीय टीमची बॅटिंग मात्र गडगडली. कोहली वगळता दुसऱ्या कोणत्याही बॅट्समनला मोठा स्कोअर करता आला नाही. इंग्लंडकडून सॅम कुरेननं सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर जेम्स अंडरसन, बेन स्टोक्स आणि आदिल रशीदला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या.

विराट कोहलीचं इंग्लंडच्या जमिनीवरचं हे पहिलं टेस्ट शतक आहे. २०१४ सालच्या सीरिजमध्ये विराट कोहलीला संघर्ष करावा लागला होता. त्या सीरिजमध्ये विराटला केवळ एकच अर्धशतक करता आलं होतं. यावेळी मात्र पहिल्या टेस्टच्या पहिल्याच इनिंगमध्ये विराटनं शतक करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा