सचिनने निवडली वर्ल्ड कपची ड्रीम टीम, ५ भारतीयांचा समावेश

२०१९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडचा ऐतिहासिक विजय झाला.

Updated: Jul 16, 2019, 06:41 PM IST
सचिनने निवडली वर्ल्ड कपची ड्रीम टीम, ५ भारतीयांचा समावेश title=

मुंबई : २०१९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडचा ऐतिहासिक विजय झाला. अत्यंत रोमांचक अशी फायनल मॅच टाय झाली. यामुळे सुपर ओव्हर घेण्यात आली, पण सुपर ओव्हरही टाय झाली. इंग्लंडने न्यूझीलंडपेक्षा जास्त बाऊंड्री मारल्यामुळे इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आलं. इंग्लंडच्या बेन स्टोक्सचा फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच देऊन आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनला मॅन ऑफ द टुर्नामेंट देऊन गौरवण्यात आलं. सचिन तेंडुलकर याच्या हस्ते या दोघांना पुरस्कार देण्यात आला.

वर्ल्ड कपची स्पर्धा संपल्यानंतर सचिन तेंडुलकरने त्याच्या ड्रीम टीमची निवड केली आहे. सचिनच्या या टीममध्ये ५ भारतीय खेळाडू, इंग्लंडचे ३ आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि बांगलादेशच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे.

विलियमसन कर्णधार

सचिनने केन विलियमसनला त्याच्या टीमचा कर्णधार बनवला आहे. सचिनच्या टीममध्ये रोहित शर्मा आणि जॉनी बेयरस्टो ओपनर आहेत. तर मधल्या फळीत केन विलियमसन आणि विराटला संधी देण्यात आली आहे. रोहित शर्माने या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक ६४८ रन केल्या. याचबरोबर एका वर्ल्ड कपमध्ये ५ शतकं करण्याचा विक्रमही रोहितने केला. केन विलियमसनने वर्ल्ड कपमध्ये ५७८ रन केले. तर विराटने स्पर्धेत ५ अर्धशतकं केली.

सचिनने फास्ट बॉलर म्हणून जसप्रीत बुमराह, जोफ्रा आर्चर आणि मिचेल स्टार्क यांना निवडलं आहे. मिचेल स्टार्कने या स्पर्धेत सर्वाधिक २७ विकेट घेतल्या. तर जोफ्रा आर्चरने २० विकेट आणि बुमराहने १८ विकेट घेतल्या. बुमराह वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे.

सर्वाधिक ऑलराऊंडर

सचिनच्या टीममध्ये सर्वाधिक ऑलराऊंडर खेळा़डू आहेत. हार्दिक पांड्या, बेन स्टोक्स, शाकिब अल हसन आणि रवींद्र जडेजा यांची सचिनने निवड केली आहे. सचिनने जडेजाचं नाव घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तर सचिनने त्याच्या टीममध्ये धोनीला संधी दिली नाही.

अशी आहे सचिनची ड्रीम टीम

रोहित शर्मा, जॉनी बेयरस्टो, केन विलियमसन(कर्णधार), विराट कोहली, शाकिब अल हसन, बेन स्टोक्स, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मिचेल स्टार्क, जसप्रीत बुमराह, जोफ्रा आर्चर