चीनी ड्रॅगनचा फुस्कार, म्हणे 'अरूणाचलचे अस्तित्व मान्य केले नाही!'

डोकलाम वाद काहीसा निवळला असला तरी, अडमुठ्या धोरणामुळे चीन पुन्हा एकदा भारताची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Jan 3, 2018, 06:06 PM IST
चीनी ड्रॅगनचा फुस्कार, म्हणे 'अरूणाचलचे अस्तित्व मान्य केले नाही!'

नवी दिल्ली : डोकलाम वाद काहीसा निवळला असला तरी, अडमुठ्या धोरणामुळे चीन पुन्हा एकदा भारताची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. भारताचे अभिन्न राज्य असलेल्या अरूणाचल प्रदेशचे अस्तित्व आम्ही स्विकारले नाही. अरूणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा हिस्सा असल्याचे चीनने बुधवारी म्हटले आहे.

चीनी सैनिकांनी अरूणाचल प्रदेशमध्ये घुसखोरी केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून आले होते. त्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालय प्रवक्ते गेंग शुआंग यांनी बुधवारी प्रतिक्रीया दिली. मात्र, चीनच्या सैनिकांनी अरूणाचलमध्ये केलेल्या घुसखोरीवर सोईस्कर मौन बाळगले. मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले होते की, चीनी सैनिक भारताचे राज्य असलेल्या अरूणाचल प्रदेशातील सिंयाग जिल्ह्यातील परिसरात 200 मीटर पर्यंत आत घुसले होते.

गेंग यांनी मीडियाला दिलेल्या माहितीत सांगितले की, सीमाप्रश्नावर आमची भूमिका अद्यापही स्पष्ट आहे. आम्ही कधीच अरूणाचल प्रदेशचा भारताचे स्वतंत्र राज्य म्हणून स्विकार केला नाही. मात्र, आपण ज्या माहितीबाबत विचारत अहात त्याबाबत मला माहिती नाही.

अरूणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा चीन वारंवार करत आले आहे. भारत आणि चीन यांच्यात नियंत्रण रेषा (LAC)  3 हजार 488 किलोमिटर इतक्या लांबीचा समेवरून वाद सुरू आहे. मीडिया रिपोर्टनुसार चीनी सैनिकांनी गेल्या महिन्यात अरूणाचल प्रदेशमध्ये अवैधरित्या घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय सैन्याने चीनी सैन्याचा हा प्रयत्न हाणून पाढला होता. भारतीय सैन्याने विरोध करताच चीनी सैनिक आपल्या सोबत घेऊन आलेली यंत्रे जागेवरच सोडून पलायन केले.