पाकिस्तानात चक्क अल्पसंख्याक मुस्लिमांनाच कुर्बानी करण्यास मनाई; पोलिसांचा आदेश

Pakistan Police On Eid Qurbani: भारतीय मुस्लिमांचा मुद्दा अनेकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानमध्येच एका मुस्लीम समाजाला कुर्बानी देण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. तशाप्रकारचा आदेशच पोलिसांनी जारी केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 28, 2023, 05:32 PM IST
पाकिस्तानात चक्क अल्पसंख्याक मुस्लिमांनाच कुर्बानी करण्यास मनाई; पोलिसांचा आदेश title=
यासंदर्भात स्थानिक पोलीस स्टेशन्सला सूचना देण्यात आल्या आहेत

Pakistan Police On Eid Qurbani: जागतिक स्तरावरील मंचावर अनेकदा भारतामधील मुस्लिमांच्या परिस्थितीवरुन आरडाओरड करणाऱ्या पाकिस्तानमध्येच बकरी ईदनिमित्त जारी करण्यात आलेल्या एका आदेशामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या पोलिसांनी अल्पसंख्यांक अहमदिया मुस्लीम (Minority Ahmadis) समाजाने बकरी ईदनिमित्त कुर्बानी देऊ नये असे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  

मोठा सांप्रदायिक वाद

पंजाब प्रांतामधील हाफिजाबाद जिल्हा पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन्सला अशाप्रकारचे आदेश पाठवले आहेत. या आदेशांमध्ये अहमदिया समाजाने कुर्बानी दिल्यास समाजातील अनेक घटकांची मनं दुखावली जातील आणि तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. मागील अनेक वर्षांपासून पाकिस्तानमध्ये अहमदिया मुस्लीम समाजाला मुस्लीम म्हणून मान्यता देण्यावरुन मोठा सांप्रदायिक वाद सुरु आहे. 

...म्हणून देण्यात आले आदेश

स्थानिक पोलीस स्थानकांना देण्यात आलेल्या निर्देशांमध्ये अहमदिया मुस्लिमांना कुर्बानी देण्यापासून रोखण्यात यावं असं नमूद करण्यात आलं आहे. अहमदिया मुस्लिमांनी कुर्बानी दिल्यास "इतर मुस्लिमांसाठी ही गोष्ट आक्षेपार्ह ठरेल," असं या आदेशात म्हटलं आहे. अहमदिया मुस्लीम समाजातील कोणत्याही व्यक्तीने हे आदेश न मानता कुर्बानी देण्याचा प्रयत्न केला तर त्याला अटक केली जाईल किंवा आर्थिक दंड ठोठावला जाईल. आईन-ए-पाकिस्तानच्या नियमांनुसार कारवाई केली जाईल. या कायद्यामध्ये किमान 3 वर्षांच्या तुरुंगवासाची तरदूत आहे. अहमदिया मुस्लिमांनी कुर्बानीचा हट्ट धरला तर सामाजिक ताणव निर्माण होईल. अशा परिस्थितीचा फायदा फुटीरतावादी घेऊ शकतात, असंही पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

कोण आहेत अहमदिया मुस्लीम?

पाकिस्तानमधील अहमदिया मुस्लिमांची संख्या ही 0.22 ते 2.2 टक्क्यांच्यादरम्यान असल्याचं सांगितलं जातं. आकडेवारीच्या अंदाजानुसार पाकिस्तानमध्ये एकूण 40 लाख अहमदिया मुस्लीम वास्तव्यास आहेत. अनेकदा या मुस्लिमांवर अत्याचाराच्या घटना घडताना दिसतात. 40 लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेला अहमदिया समाजातील व्यक्ती दिवसातून 5 वेळा नमाज अदा करण्याबरोबरच हजच्या यात्रेलाही जातात. म्हणजेच सामान्य मुस्लिमांप्रमाणे ते सर्व धार्मिक रितीरिवाजांचं पालन करतात. मात्र पाकिस्तानमध्ये हा समाज मुस्लीम धर्मीय असल्याचं मानलं जात नाही.  पीईडब्यू रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार पाकिस्तानमधील केवळ 7 टक्के जनता अहमदिया मुस्लिमांना मुस्लमान असल्याचं मानते. यंदाच्या वर्षी पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. त्यामुळे पाकिस्तानी सरकार आणि लष्करालाही इतर मुस्लीम समाज हा अहमदिया मुस्लीमांच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालेलं परवडणार नाही. त्यामुळेच प्रामुख्याने अहमदिया समाजाचं वास्तव्य असलेल्या जिल्ह्यामध्ये कुर्बानी न देण्यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहेत. अहमदिया समाज हा पाकिस्तानमधील सर्वात सुरक्षित समाज मानला जातो.