प्रत्येक आई असतेच 'हिरकणी'; पाहा एका अविश्वसनीय थराराची झलक

चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला 

Updated: Oct 1, 2019, 04:35 PM IST
प्रत्येक आई असतेच 'हिरकणी'; पाहा एका अविश्वसनीय थराराची झलक  title=
हिरकणी

मुंबई : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या हिरकणी या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. शिवकालीन प्रसंग, राहणीमान आणि एका अविश्वसनीय घटनेला मोठ्या पडद्यावर साकारत या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे प्रसाद ओक याने. 

नुकताच या चित्रपटाच्या टीझरने साऱ्यांचं लक्ष वेधले आहे. 'प्रहर बदलला की तोफ वाजते....' असं म्हणत या टीझरची सुरुवात होते. गडावरचं वातावरण, देवघर आणि एका व्याकुळ आईची झलक या टीझरमधून पाहायला मिळते. 

''होता समोर अंधार
सोबतीला नाही कोणी
केला एकच निर्धार
उतरली 'हिरकणी'...!!!'', अशा अवघ्या चार ओळी लिहीत काही सेकंदांचा हा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. 

सुर्यास्तानंतर गडाची दारं बंद झाल्यानंतर ती थेट सुर्योदयानंतर उघडतात, असे शब्द कानांवर पडतात तेव्हा आठवण होते, ती म्हणजे शालेय जीवनात वाचलेल्या काही संदर्भांची शिवकालीन पराक्रमी वीरांची आणि एका आईची....... हिरकणीची. 

गडावर दूध पोहोचवण्यासाठी म्हणून गेलेल्या हिरकणीने घरी असणाऱ्या एकट्या बाळासाठी कशा प्रकारे कडा उतरण्याचा पराक्रम केला होता, यावर या चित्रपटाचून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. कडेकपारिंतून, कोणत्याही मदतीशिवाय मोठ्या धीराने कडा उतरणारी हिकरणी म्हणजे साहस आणि मातृत्वाची सांगड घालणारं एक प्रतिकच. हीच अविश्वसनीय शौर्यगाथा २४ ऑक्टोबरला चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे.