अनेक आजारांचे कारण लठ्ठपणा; असे ठेवा नियंत्रण

लठ्ठपणामुळे आलेल्या रोगांची शक्यता तपासण्यासाठी व्यक्तीच्या बॉडी मास इंडेक्सचे मापन केले जाते.

Updated: Apr 3, 2019, 12:59 PM IST
अनेक आजारांचे कारण लठ्ठपणा; असे ठेवा नियंत्रण  title=

मुंबई : दररोज पुढे जाण्याच्या शर्यतीत प्रत्येक व्यक्ती धकाधकीचं आयुष्य जगत आहे. लवकर पुढे जात लवकर यश मिळवण्याच्या नादात अनेक जण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. सोपं,लवकर आणि जिभेच्या चवी पुरवण्यासाठी अनेक जण फास्ट फूडच्या आहारी गेले आहेत. या फास्ट फूडमुळेच अनेक जण लठ्ठपणाचे शिकार होत आहेत. अशाप्रकारे आलेला लठ्ठपणा कमी करणं तितकंस सोप नाही. लठ्ठपणामुळेच शरीरात अनेक प्रकारचे विकार बळावतात. अनेक आजारांचे कारण लठ्ठपणा असून शरीरातील लठ्ठपणामुळेच अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. 

लठ्ठपणाचे निदान व्यक्तीच्या शारीरिक तपासणी आणि त्याच्या इतिहासावर अवलंबून आहे. लठ्ठपणामुळे आलेल्या रोगांची शक्यता तपासण्यासाठी व्यक्तीच्या 'बीएमआय' बॉडी मास इंडेक्सचे मापन केले जाते. आई-वडिलांपैकी एकाला लठ्ठपणा असल्यास मुलांमध्येही लठ्ठपणा होण्याची शक्यता असते. कॅलरीयुक्त आहार, जंक, फास्ट फूड, पेय पदार्थ्यांचे अधिक सेवन यामुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होण्यास सुरुवात होते. फळं, भाज्या यांच्या कमी सेवनानेही व्यक्ती लठ्ठपणाचा शिकार होऊ शकतात. 

लठ्ठपणामुळे स्ट्रोक, कॅन्सर, प्रजनन क्षमता कमी होणे, ऑस्ट्रियोआर्थराइटिस, टाइप २ डायबिटीज, पित्ताशयाचे आजार, उच्च रक्तदाब, लिवरला सूज येणे, श्वास घेण्यास अडथळा, नर्व डिस्ऑर्डर यांसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. 

यांसारखे आजार बळावू नये यासाठी नियमित व्यायामाने वजन नियंत्रणात ठेवू शकता. जोरात चालणे, पोहणे, सायकल चालवणे यांसारखे व्यायाम करू शकता. दिवसांतून तीन वेळा नियमित आहार घ्या. काही लोक भूक लागण्यावर कोणत्याही वेळी खातात. वेळ न पाहता गोड पदार्थ आणि फास्ट फूड खातात. त्यामुळे लठ्ठपणा वाढीस लागतो. कमी कॅलरीयुक्त आहार, फळं, भाज्या, कडधान्यांचे सेवन करा. मिठाई, अल्कोहलचे सेवन अगदी कमी प्रमाणात करा. अतिरिक्त चरबी वाढवणारे पदार्थ खाण्यापासून लांब राहा. 

दिवसभरात आवश्यक तेवेढे पाणी प्या. काकडी, लिंबू, आलं, पुदिन्याचा रस वजन कमी करण्यास मदत करतात. विशेषत: पोटातील फॅट कमी करण्यास या फळांचा रस फायदेशीर ठरतो. फॅट कमी करण्यासाठी ग्रीन टी, दही, डाळी, ओट्स, अंडी अशा पदार्थांचे सेवनही लाभदायक ठरते.