विम्याची रक्कम मिळवण्यासाठी मुलाने केली आईची हत्या; नंतर वडिलांकडे वळताना हात थरथरु लागले, अखेर...

विम्याची रक्कम मिळवण्यासाठी मुलानेच आपल्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर यमुना नदीच्या किनारी त्याने मृतदेह फेकून दिला. पण हात थरथरु लागल्याने तो वडिलांची हत्या करु शकला नाही.   

शिवराज यादव | Updated: Feb 22, 2024, 04:16 PM IST
विम्याची रक्कम मिळवण्यासाठी मुलाने केली आईची हत्या; नंतर वडिलांकडे वळताना हात थरथरु लागले, अखेर... title=

विम्याचे 55 लाख मिळवण्यासाठी मुलानेच आपल्या आईची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यात मुलाने आईची हत्या केल्यानंतर मृतदेह यमुना नदीच्या किनारी फेकून दिलं. ग्रामस्थांनी शोध घेतला असता मृतदेह सापडला आहे. वडिलांनी मुलाच्या हालचालींवर संशय आल्याने पोलीस ठाण्यात तक्रार केली. यानंतर आरोपी मुलगा घऱातून फरार झाला आहे. या हत्येत आणखी दोन लोक सहभागी झाले होते असं सांगितलं जात आहे. 

रोशन सिंह पटेल मंगळवारी सकाळी हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दुपारी 1 वाजता ते घऱी परतले होते. घऱी पत्नी प्रभा देवी न दिसल्याने त्यांनी विचारणा केली असता, मुलगा हिमांशूने आजीची तब्येत खराब झाल्याने सुनारी गावाला गेली असल्याचं सांगितलं. जेवण बनवल्यानंतर संध्याकाळी शेताला पाणी द्यायचं सांगून हिमांशू घराबाहेर पडला. रात्री उशिरा परतल्यानंतर तो झोपी गेला. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्यांना जाग आली तेव्हा खाटेच्या शेजारी लोखंडी रॉड व धारदार काठी पडलेली होती. यावेळी घराचे सर्व दरवाजे उघडे असल्याने त्यांना घऱात चोर शिरल्याची भीती वाटली. ते गच्चीवर गेले असता तिथे हिमांशू होता. त्याचा अवतार पाहून रोशन घाबरले आणि घऱात जाऊन दरवाजा बंद केला. 

संशय आल्याने रोशन यांनी पेंढ्याच्या कोठारात जाऊन पाहिलं, तेव्हा तिथे जमिनीवरुन फरफटत नेल्याच्या खुणा दिसल्या. पत्नीची चप्पल तिथेच पडलेली होती. घाबरलेले रोशन घऱातच लपले होते. त्यांच्या मोबाईलवरुन सर्व नंबरही डिलीट करण्यात आले होते, जेणेकरुन ते कोणाशीही संपर्क साधू शकणार नाहीत. बुधवारी सकाळी चुलत भाऊ आला असता त्यांनी सगळा घटनाक्रम सांगितला. 

चुलत भाऊ जय सिंहने सुनारी गावात फोन करुन चौकशी केली असता वहिनी तिथे आलीच नसल्याचं समजलं. सकाळी 6 वाजता सर्वजण दरवाजा उघडून हिमांशूची चौकशी करण्यास पोहोचले. पण तो जागेवर नव्हता. शेजाऱ्यांच्या छतावरुन त्याने पळ काढला होता. यादरम्यान प्रभा देवी यांचा शोध घेतला असता नदीकिनारी मृतदेह सापडला. 

पोलिसांनी सांगितलं की, वडिलांनी केलेल्या आरोपानुसार विम्याचे 55 लाख रुपये मिळवण्यासाठी मुलाने आईची हत्या कली आहे. वडिलांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी मुलाचा शोध घेतला जात आहे. या हत्येत आणखी दोनजण सहभागी असावेत अशी शंका आहे. 

हिमांशू आईची हत्या केल्यानंतर वडिलांची हत्या करण्यासाठी पोहोचला होता. पण वडिलांच्या हत्येसाठी पोहोचला असता त्याचे हात थरथरले. वडील झोपेत असल्याने त्याच्याकडे त्यांना ठार करण्याची पूर्ण संधी होती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमांशूला सट्ट्याचं व्यसन होतं. तो ऑनलाइन सट्टा खेळायचा. त्याने अनेक लोकांकडून कर्ज घेतलं होतं. तसंच त्याने घऱातून काही दागिने चोरले होते. या सर्व गोष्टींमुळे तो तणावात होता. त्यातूनच त्याने आईची हत्या केली. त्याला मृतदेह नदीत फेकायचं होतं. पण तिथे सुरक्षा कर्मचाऱ्याने हटकल्याने त्यांना एका ढिगाऱ्यामागे मृतदेह फेकावा लागला.