VIDEO : भारतीय सैन्यदलात दाखल होण्यासाठी हजारो काश्मिरी तरुणांची गर्दी

तणावाच्या वातावरणातही काश्मिरी तरुण देशसेवेसाठी पुढे सरसावले 

Updated: Feb 20, 2019, 01:46 PM IST
VIDEO  : भारतीय सैन्यदलात दाखल होण्यासाठी हजारो काश्मिरी तरुणांची गर्दी  title=

बारामुल्ला : सतत खाली जाणारा तापमानाचा पारा, अतिथंडी, बर्फवृष्टी आणि अवेळी पावसाचा मारा सहन करत काश्मिरी तरुण सैन्यदलाच्या दिशेने निघाले आहेत. भारतीय सैन्याच्या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मंगळवारी जम्मू- काश्मीरच्या गंतेमुल्ला येथे पार पडलेल्या भरतीला काश्मिरी तरुणांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. 

'काश्मिरच्या तरुणांनी भारतीय सैन्यात सहभागी होण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ही भरती गंतेमुल्ला, बारामुल्ला या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती', अशी माहिती देत भारतीय सैन्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरुन याविषयीची पोस्ट करण्यात आली. निस्सिम देशभक्ती, भविष्य आणि करिअरच्या चांगल्या संधीचा उल्लेख या पोस्टच्या कॅप्शनमध्ये करण्यात आला होता. 

सैन्यदलाच्या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये भरतीसाठी आलेले अनेक काश्मिरी तरुण हे लांबच लांब रांगांमध्ये उभे असल्याचं पाहायला मिळत आहे. 'एएनाय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार १११ जागांसाठी सुरु असणाऱ्या या भरतीमध्ये जवळपास अडीच हजार तरुणांचा सहभाग नोंदवला गेला. 

पुलावामा हल्ल्याच्या पाच दिवसांनंतर ही भरती आयोजित करण्यात आली होती. १४ फेब्रुवारीला पुलवामा येथील अवंतीपोरा भागात सीआरपीएफ जवानांच्या बसच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. जैश-ए- मोहम्मदकडून घडवण्यात आलेल्या या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांनी प्राण गमावले होते. ज्यानंतर काश्मीर खोऱ्यात तणावाची परिस्थिती पाहिली गेली. पण, सैन्यदलाच्या भारतीला मिळालेला हा प्रतिसाद पाहता ही एक सकारात्मक बाब असल्याचं स्पष्ट होत आहे.