मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी, ६ काँग्रेस आमदारांचा राजीनामा

मणिपूरमध्ये एनडीए सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला.

Updated: Aug 11, 2020, 09:34 AM IST
मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी, ६ काँग्रेस आमदारांचा राजीनामा title=

इम्फाळ : मणिपूर विधानसभेत मोठ्या गदारोळात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात एनडीए सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. मुख्यमंत्री एन. बीरेनसिंग विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी झाले आहेत. सभापतींनी अविश्वास ठराव स्वीकार न केल्याने विरोधकांनी सभागृहात प्रचंड गोंधळ केला. विरोधी नेत्यांनी सभापतीविरोधात निदर्शने केली आणि खुर्च्या फेकल्या.

सभापतींच्या निर्णयाचा बचाव करीत सीएम बिरेन सिंह म्हणाले की, संख्याबळ असल्याने आम्ही जिंकलो. मुख्यमंत्री बीरेन सिंह म्हणाले, आम्ही आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला. स्पीकर जे काही करत आहे ते नियमानुसार आहे. विरोधकांकडे आमदारांची संख्या कमी होती. दुसरीकडे विरोधी पक्षनेते ओ इबोबी सिंग यांनी याला लोकशाहीची हत्या म्हटले आहे.

त्याचवेळी मतदानानंतर काँग्रेसच्या 6 आमदारांनी राजीनामा दिला आहे. राम माधव यांनी सीएम बिरेन सिंह यांचे अभिनंदन केले आहे.

मतदानापूर्वी काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना व्हिप जारी केला. व्हीपमध्ये सर्व सदस्यांना उपस्थित राहण्यास सांगितले होते. राज्यसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या तेव्हा काही काँग्रेसच्या आमदारांनी भाजप समर्थित असलेल्या उमेदवाराच्या बाजूने मतदान केले. या घटनेनंतर आमदारांना कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आल्या होत्या.

मुख्यमंत्री एन. बीरेनसिंग यांनी शुक्रवारी विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव मांडला. विरोधात असलेल्या काँग्रेसने अविश्वास ठराव आणल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. मणिपूरमध्ये बराच काळ राजकीय वाद सुरु आहे. काही आमदार आणि मंत्र्यांनी भाजपप्रणित युती सरकारविरूद्ध बंड केले होते. त्यामुळे काँग्रेस देखील सक्रिय झाली आणि २८ जुलै रोजी विधानसभेत अविश्वास ठराव आणला होता.