कर्नाटक- गोव्यातील सत्ता संघर्षाच्या मुद्द्यावरून विरोधकांचे आंदोलन

 कर्नाटक आणि गोव्यातील सत्ता संघर्षाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आंदोलन केले.  

ANI | Updated: Jul 11, 2019, 12:49 PM IST
 कर्नाटक- गोव्यातील सत्ता संघर्षाच्या मुद्द्यावरून विरोधकांचे आंदोलन title=

नवी दिल्ली : संसद भवन परिसरात विरोधकांनी आंदोलन केले. कर्नाटक आणि गोव्यातील सत्ता संघर्षाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी हे आंदोलन केले. विविध मार्गांनी आमदारांची कोंडी करून त्यांना भाजपमध्ये येण्याची जबरदस्ती केली जात आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. या आंदोलनात ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, आनंद शर्मा हे सहभागी झाले होते. महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर हे आंदोलन केले.

या आंदोलनात काँग्रेससोबत तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाचे खासदारही सहभागी झाले. लोकशाहीची हत्या थांबवा, लोकशाही वाचवा अशा घोषणा देणारे फलक विरोधकांनी यावेळी झळकावले. 

कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोर आमदारांनी राजीनामे दिलेत. मात्र, राजीनामा दिलेले काँग्रेसचे आमदार सांगत आहेत. आम्ही आमदारकीचा राजीनामा दिला आहे, काँग्रेसचा नाही. त्यामुळे आम्ही काँग्रेसमध्येच आहोत. तसेच जेडीएसच्या तीन आमदारांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे दहा आमदारांनी राजीनामा देत मुंबई गाठली. दरम्यान, आणखी एका काँग्रेसच्या आमदाराने राजीनामा दिला आहे. त्यामुळे जेडीएस-काँग्रेस मैत्री सहकार संकटात सापडले आहे.

कर्नाटकात सत्ता संघर्ष सुरु असताना गोव्यातही काँग्रेसच्या आमदारांना वेगळा गट स्थापन करत भाजपमध्ये दाखल झाला. १५ पैकी १० आमदार भाजपात ढेरेदाखल झाले. त्यामुळे काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी दिल्लीत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करत भाजप लोकशाहीला धोका पोहोचवत आहे, असा आरोप केला. हे सगळे घडविण्यामागे भाजपचाच हात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.