हिंमत असेल तर काँग्रेसने 'हे' करुनच दाखवावे- मोदी

गांधी घराण्याच्या चार पिढ्यांनी काँग्रेसवर राज्य केले.

Updated: Nov 18, 2018, 03:55 PM IST
हिंमत असेल तर काँग्रेसने 'हे' करुनच दाखवावे- मोदी title=

रायपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षातील घराणेशाहीवरून गांधी परिवाराला लक्ष्य केले. ते रविवारी छत्तीसगढच्या महासमुंद येथील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, सीताराम केसरी काँग्रेसच्या अध्यक्षपदी असताना त्यांच्यासोबत काय झाले, हे सर्वांनाच माहिती आहे. माझं काँग्रेसला आव्हान आहे की, हिंमत असेल तर त्यांनी पक्षाचे अध्यक्षपद गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीकडे द्यावे, असे मोदींनी म्हटले. 

गांधी घराण्याच्या चार पिढ्यांनी काँग्रेसवर राज्य केले. सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाचा कधी विचारच केला नाही. त्यांनी फक्त एकाच घराण्याचा विचार केला. त्यामुळे ते जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील यावर विश्वास तरी कसा ठेवायचा? काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार हे रिमोट कंट्रोलवरील सरकार होते, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. छत्तीसगडमध्ये २० नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. या मतदानाचा निकाल ११ डिसेंबरला जाहीर होईल.