केजरीवाल सरकारची महिलांसाठी खास भाऊबीज

दिल्ली परिवहन निगम (डीटीसी)च्या बसमध्ये मार्शलची संख्या वाढवून जवळपास १३,००० करण्यात येणार आहे

Updated: Oct 29, 2019, 04:45 PM IST
केजरीवाल सरकारची महिलांसाठी खास भाऊबीज  title=

नवी दिल्ली : दिल्लीतल्या केजरीवाल सरकारनं भाऊबीजेच्या निमित्तानं महिलांना मोठी भेट दिलीय. दिल्लीत आजपासून महिलांसाठी मोफत बस प्रवास सुरू करण्यात आलाय. डीटीसीसह क्लस्टर बसेसमध्येही हा प्रवास मोफत असणार आहे. त्यामुळे दिल्लीतल्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी केजरीवाल सरकारनं हा निर्णय घेतला होता. त्याची आजपासून म्हणजे भाऊबीजेच्या मुहुर्तावर अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रत्येक बसमध्ये एक मार्शल तैनात करण्यात येणार आहे. तब्बल सहा हजार मार्शल्सना प्रशिक्षण देण्यात आलं असून आजपासून ते सेवेत रुजू होणार आहे. 

दिल्ली परिवहन निगम (डीटीसी)च्या बसमध्ये मार्शलची संख्या वाढवून जवळपास १३,००० करण्यात येणार आहे. 'महिलांना सुरक्षितता पुरविण्यासाठी मंगळवारपासून प्रत्येक बसमध्ये मार्शल तैनात करण्यात येत आहेत. हे मार्शल आजारी व्यक्तींची मदत करतील तसंच आपात्कालीन परिस्थितीचा सामनाही करतील. दिल्ली हे एकमेव राज्य आहे जिथे जनतेच्या सुरक्षेसाठी मार्शल तैनात केले जात आहेत' असं केजरीवाल यांनी त्यागराज स्टेडियममध्ये रंगरुट मार्शल्सना संबोधित करताना म्हटलं. 

रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांना मोफत प्रवासाची सुविधाही अरविंद केजरीवाल यांनी उपलब्ध करून दिली होती. आज भाऊबीजेच्या निमित्तानं या बहिणींची सुरक्षितताही निश्चित करत असल्याचं त्यांनी म्हटलं.  

नव्या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यासोबतच पॅनिक बटनही असतील. तसंच अपंग व्यक्तींसाठी हायड्रोलिक लिफ्टची सुविधाही या बसमध्ये असेल.