बर्फवृष्टीत अडकले पर्यटक, सोशल मीडियामुळे मदतीचा ओघ सुरू

'इथे वीजपुरवठाही सुरळीत सुरू नाही'

Updated: Jan 30, 2019, 07:50 AM IST
बर्फवृष्टीत अडकले पर्यटक, सोशल मीडियामुळे मदतीचा ओघ सुरू  title=

देहरादून : देशातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून, आता हवामान खात्यानेही या भागांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्याचा पर्यटनासाठीचा पूरक काळ पाहता पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठीसुद्धा स्थानिक प्रशासनाकडून बऱ्याच सोयी-सुविधा पुरवण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरीही या वातावरणात काही पर्यटक मात्र उत्तराखंडमध्ये अडकले असून, त्यांनी मदतीसाठी सोशल मीडियाची मदत घेतली आहे. 

तापामानाच्या पाऱ्याने निचांक गाठल्यामुळे दिल्लीचे काही पर्यटक उत्तराखंडमधील चकराता येथे अडकल्याचं वृत्तं समोर येत आहे. या पर्यटकांनी मदतीसाठी अखेर सोशल मीडियाची मदत घेतली. हॉटेल लोखंडी येखून आपली सुटका करण्याचं आवाहन त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत केलं आहे. अडकलेल्या या पर्यटकांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. व्हिडिओमध्येही ही महिला आपली मदत करावी अशी कळकळीची विनंती सर्वांना केली. 

'आम्ही इथे अडकलो आहोत. संबंधित अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया आमच्यापर्यंत मदतीचा हात पोहोचवावा. आम्ही थांबलो आहोत त्या हॉटेलमध्ये आता अन्न आणि पाण्याचा तुडवडा जाणवू लागला आहे. इथे वीजपुरवठाही सुरळीत सुरू नाही', अस ती महिला या व्हिडिओमध्ये म्हणत होती. 

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रभावित क्षेत्रातील बर्फ हटवण्यासाठी जेसीबी आणि आईस कटर पाठवण्याच आले असून, परिसरात मदत पोहोचवण्याचं काम सुरू झाल्याची माहिती 'आएएनएस' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केली. देहरादून येथील आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील अधिकारी दीपशिखा रावत यांनीही आपण अडकलेल्या त्या पर्यटकांच्या संपर्कात असल्याची माहिती दिल्याचं कळत आहे. 'मी पर्यटकांशी सपर्क साधला असून ते हॉटेलमध्ये सुखरुप आहेत. हॉटेलच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्यामुळे ते त्या ठिकाणी अडकले होते', असं त्या म्हणालेल्या. उत्तराखंड, हिमाचल, जम्मू काश्मीर येथे पुढील काही दिसही तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांनीही ही परिस्थिती पाहता विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.