पंतप्रधान मोदींसह अनेक नेत्यांची करुणानिधींना ट्विटर श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विटरवर करुणानिधी यांना आदरांजली वाहिलीय. 

Updated: Aug 7, 2018, 07:29 PM IST
पंतप्रधान मोदींसह अनेक नेत्यांची करुणानिधींना ट्विटर श्रद्धांजली  title=

मुंबई : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांचं मंगळवारी सायंकाळी चेन्नईतील कावेरी रुग्णालयात निधन झालंय. मृत्यूसमयी ९४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर चेन्नईतील कावेरी रुग्णालयात उपचार सुरू होते. इथेच त्यांनी सायंकाळी ६.१० वाजता अखेरचा श्वास घेतला. करुणानिधी यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विटरवर करुणानिधी यांना आदरांजली वाहिलीय. 

एम करुणानिधी यांचं खरं नाव मुत्तुवेल करुणानिधी... ३ जून १९२४ रोजी त्यांचा जन्म झाला होता. १९४९ साली त्यांनी अण्णादुराई यांच्यासोबत द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाची स्थापना केली आणि ते त्या पक्षाचे पहिले कोषाध्यक्ष झाले. १९५७ साली द्रमुकने तामिळनाडू विधानसभेची पहिली निवडणूक लढवली आणि पक्षाचे १३ सदस्य विधानसभेत निवडून गेले. त्यामध्ये करुणानिधी यांचा समावेश होते. ते कुलीतलाईमधून मतदारसंघातून निवडणूक लढले होते. त्यानंतर त्यांनी १२ वेळा विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते नेहमीच विजयी होत राहिले. १९६० साली डीएमके पक्षाचे प्रमुख एन. अण्णादुराई यांचे निधन झाल्यानंतर करुणानिधी यांनी डीएमकेचे अध्यक्षपद स्वीकारले होते. तेव्हापासून अखेरपर्यंत त्यांनी डीएमकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. यादरम्यान पाचवेळा त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपद सांभाळले.