ममता बॅनर्जी विरुद्ध मोदी सरकार : सुंदरबनाच्या दलदलीत कोण उमलणार?

आता लढाई गंगेकाठी नाही, तर सुंदरबनाच्या दलदलीत रंगणार असं दिसतंय

Updated: Feb 5, 2019, 11:53 AM IST
ममता बॅनर्जी विरुद्ध मोदी सरकार : सुंदरबनाच्या दलदलीत कोण उमलणार? title=

नवी दिल्ली : २०१९ च्या लोकसभा निवडणुकांचा केंद्रबिंदू उत्तर प्रदेशात नव्हे, तर पश्चिम बंगालमध्ये असणार आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात खऱ्या अर्थानं घनघोर रणसंग्राम होताना दिसेल. तब्बल १३ वर्षांनी ममता बॅनर्जींनी आपलं 'धरणा'स्त्र बाहेर काढलंय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जी पुन्हा एकदा धरणं देत बसल्या आहेत... सलग तिसऱ्या दिवशीही ममता बॅनर्जींचं धरणं आंदोलन सुरू आहे. पक्षाचे अनेक नेते आणि विरोधी पक्षाचे नेते त्यांची भेट घेत आहेत... लोकसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी विरोधकांचा 'केंद्रबिंदू' होताना दिसत आहेत. मुद्दा आहे तो राजकीय वर्चस्वाचा... १३ वर्षांपूर्वी सिंगूरमध्ये २६ दिवस आंदोलन करून ममतादीदींनी पश्चिम बंगालमधल्या डाव्यांच्या प्रदीर्घ सत्तेला सुरूंग लावला. तेव्हापासून बंगालमध्ये ममतांना कुणीही खुलं आव्हान दिलं नव्हतं. पश्चिम बंगालमध्ये डावे आणि काँग्रेस गलितगात्र झाल्यानं निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी भाजपानं कंबर कसलीय. त्यामुळं तृणमूल विरुद्ध भाजपा असा राजकीय रणसंग्राम बंगालच्या किनाऱ्यावर छेडला गेलाय. 

मोदी - शाहांनी राज्यघटणेशी सुरु केलेला खेळ जोवर थांबत नाही तोवर मागे हटणार नाही, अशी प्रतिज्ञाच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांन घेतलीय. त्यामुळेच, आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पश्चिम बंगाल आणि कोलकात्याचं राजकीय महत्त्व अचानक वाढलंय. याचं दुसरं कारण म्हणजेच ममता दीदींना पंतप्रधानपदाची स्वप्न? पडू लागलीत की काय, अशीही चर्चा राजकीय वर्तुळातून सुरू आहे.

ममता दीदींना पंतप्रधानपदाची स्वप्न?

- उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रानंतर लोकसभेच्या सर्वाधिक ४२ जागा पश्चिम बंगालमध्ये आहेत

- २०१४ मध्ये तृणमूल काँग्रेसनं ४२ पैकी ३४ जागा जिंकल्या. त्यामुळे तो लोकसभेतला चौथा मोठा पक्ष ठरला.

- यंदाच्या निवडणुकीत तृणमूलला घवघवीत यश मिळालं तर विरोधकांच्या महाआघाडीत पंतप्रधानपदावरील ममतांचा दावा पक्का होऊ शकतो.

हे झालं, ममता बॅनर्जींचं... पण हिंदीपट्ट्यात घट्ट पाळंमुळं असणाऱ्या भाजपाला पूर्वेकडची राज्यं इतकी महत्त्वाची वाटायला लागण्यामागं आणखी काही खास राजकीय समीकरणं आहेत.

Opposition
फाईल फोटो

बंगालमध्ये मोदींचा जीव का अडकलाय?

- भाजपाला उत्तर प्रदेशात गेल्यावेळेइतकं यश मिळणं अशक्य आहे. महाराष्ट्रात भाजपाकडे आधीच सत्ता आहे

- उत्तर प्रदेशात होणारं नुकसान दक्षिणेकडेकडील राज्यांतून भरून काढणं अवघड आहे

- त्यामुळेच भाजपानं पश्चिम बंगाल निवडलाय. तिथे ममतांना आव्हान देणाऱ्या सशक्त विरोधी पक्षाची जागा रिक्त आहे

- भाजपानं जोरदार प्रचार करून जनतेसमोर ममतांना पर्याय निर्माण करण्याचा निश्चय केला. म्हणूनच ममता सरकारविरोधात जोरदार राजकीय हल्ले सुरू झालेत

दिल्लीतल्या सत्तेचा राजमार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असं म्हणतात. २०१४ मध्ये भाजपानं याच राजमार्गानं विजय मिळवला. पण आता लढाई गंगेकाठी नाही, तर सुंदरबनाच्या दलदलीत रंगणार असं दिसतंय. या दलदलीत तृणमूलचं फूल फुलतंय की, भाजपाचं कमळ, यावर दिल्लीतलं सत्ताकारण अवलंबून असेल...