इस्लाम सोडून वसिम रिझवी यांनी स्वीकारला हिंदू धर्म; काय आहे त्यांची नवी ओळख?

इस्लाम धर्म त्यागल्यानंतर रिझवी म्हणाले...

Updated: Dec 6, 2021, 01:55 PM IST
इस्लाम सोडून वसिम रिझवी यांनी स्वीकारला हिंदू धर्म; काय आहे त्यांची नवी ओळख?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

नवी दिल्ली : शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसिम रिझवी यांनी सनातन धर्म स्वीकारला आहे. ज्यामुळं त्यांची नवी ओळख आता साऱ्या जगासमोर आली आहे. यापुढं ते जितेंद्र नारायण सिंह त्यागी या नावानं ओळखले जातील. 

इस्लाम धर्म त्यागल्यानंतर रिझवी म्हणाले, 'इथं धर्म परिवर्तनाची कोणतीही बाब नाही. ज्यावेळी मला मुस्लिम धर्मातून काढलं त्यानंतर मी कोणता धर्म स्वीकारावा हा सर्वस्वी माझा निर्णय असेल. 

सनातन धर्म हा जगातील सर्वात पहिला धर्म आहे. या धर्मात असणाऱ्या अनेक चांगल्या गोष्टी इतर धर्मांमध्ये नाहीत. 

मी इस्लामला धर्म मानत नाही. प्रत्येक जुम्म्याला नमाज पठणानंतर आमचं शिर कलम करण्याचा फतवा काढला जातो. त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये आम्हाला कोणी मुस्लिम म्हणणं ही शरमेची बाब ठरते.'

सोमवारी गाजियाबादमध्ये यती नरसिंहानंद यांनी वसिम रिझवी यांना हिंदू धर्मात समाविष्ट करुन घेतलं. 

धर्मांतर केल्यानंतर रिझवी म्हणजेच जितेंद्र नारायण त्यागी मंदिरात दिसले. इथं त्यांच्या कपाळी टिळा लावण्यात आला होता. गळ्यामध्ये त्यांनी एक केशरी रंगाचं वस्त्र घेतलं होतं. 

दोन्ही हात जोडून ते देवाची प्रार्थना करताना दिसले. रिझवी गेल्या काही काळापासून त्यांच्या मुस्लिम आणि इस्लाम विरोधी वक्तव्यांमुळं चर्चेत आले होते. ज्यामुळं या समाजात त्यांच्याविषयी प्रचंड द्वेषभावना पाहायला मिळाली होती. 

काही दिवसांपूर्वीच रिझवी यांनी मृत्यूपत्र जाहीर केलं होतं. जिथं आपल्याला दफन न करता हिंदू पद्धतीनं अंत्यविधी करावेत असं त्यांनी नमूद केलं होतं. 

यती नरसिंहानंद यांनीच अंत्यविधी करावेत असंही यामध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं. 

दरम्यान, इस्लामचा धर्मग्रंथ असणाऱ्या कुराऩमधून 26 आयत हटवण्याची मागणी करण्यासंबंधीची एक याचिका रिझवी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. 

सदर प्रकरणी सुनावणीही झाली, पण याचिका फेटाळली गेली. तेव्हापासूनच रिझवी मुस्लिम संघटनांच्या निशाण्यावर आहेत.