'फॅनी'चा दणका : मोदी करणार ओडिशातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशातील फॅनी वादळामुळे नुकसान झालेल्या परिसराची पाहणी करणार आहेत. 

Updated: May 6, 2019, 10:26 AM IST
'फॅनी'चा दणका : मोदी करणार ओडिशातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी title=

भुवनेश्वर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशातील फॅनी वादळामुळे नुकसान झालेल्या परिसराची पाहणी करणार आहेत. फॅनी चक्रीवादळाचा फटका बसलेल्या राज्यांना केंद्र सरकार सर्वतऱ्हेची मदत करेल, असे आश्वासन त्यांनी दौऱ्यापूर्वीच दिले आहे. फॅनीचा तडाखा बसलेल्या परिसराची पाहणी केल्यानंतर पंतप्रधान पुरीलाही भेट देणार आहेत. दरम्यान, ओडिशातील फॅनी वादळात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या २९ वर पोहोचली आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मदत पॅकेजची घोषणा केली आहे.

‘फॅनी’ चक्रीवादळाने शुक्रवारी ओडिशाच्या सागरी किनारपट्टीला जोरदार धडक देत हाहाकार माजवला. या वादळाचा वेग ताशी २२५ किलोमीटर इतका होता. वादळाच्या या तडाख्यात आठ जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले. आता मृतांचा आकडा वाढला आहे. मात्र ओडिशा सरकार आणि प्रशासन वेळीच सतर्क राहिल्याने मोठी हानी टळली आहे.  

या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका पुरी जिल्ह्याला बसला असला तरी राजधानी भुवनेश्‍वरही  वादळात सापडले. तेथेही ताशी १४० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. या वादळी वार्‍यामुळे अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावरच  झाडे पडली. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. याशिवाय इमारतीचा काही भाग कोसळल्याने एक महिला ढिगार्‍याखाली सापडून जीव गेला.