'सांभाळून राहा, नाही तर...', SDM कृती राज यांनी डोक्यावर पदर घेऊन छापा मारल्यानंतर अखिलेश यादवांचं विधान

उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमधील उपविभागीय दंडाधिकारी कृती राज यांनी सरकारी रुग्णालयावर धाड टाकत तेथील घोटाळा उघड केला आहे. यानंतर अखिलेश यादव यांनी कारवाईवर भाष्य केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Mar 14, 2024, 05:03 PM IST
'सांभाळून राहा, नाही तर...', SDM कृती राज यांनी डोक्यावर पदर घेऊन छापा मारल्यानंतर अखिलेश यादवांचं विधान title=

उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमधील उपविभागीय दंडाधिकारी कृती राज यांनी सरकारी रुग्णालयावर केलेल्या कारवाईची सध्या चर्चा सुरु आहे. कृती राज यांनी सरकारी रुग्णालयाला भेट देत धाड टाकली. यावेळी त्या रुग्ण बनून पोहोचल्या होत्या. यानंतर त्यांनी सरकारी रुग्णालयातील भोंगळ कारभार, त्रुटी समोर आणल्या आहेत. दरम्यान या कारवाईनंतर समाजवादी पक्षाते (एसपी) प्रमुख अखिलेश यादव यांनी कृती राज यांनी सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. या कारवाईवर उपहासात्मकपणे बोलताना त्यांनी आरोग्यमंत्री अस्वस्थ असल्याचं म्हटलं आहे. 

झालं असं की, एसडीएम कृती राज यांना आरोग्य विभागाकडून अनियमितता, भ्रष्टाचार आणि गैरवर्तन केलं जात असल्याच्या तक्रारी मिळत होत्या. त्यामुळे 12 मार्च रोजी त्या दिदामई येथील सरकारी रुग्णालयाचा आढावा घेण्यासाठी पोहोचल्या होत्या. पण यावेळी त्यांनी आपली ओळख उघड केली नाही. त्यांनी आपल्या चेहऱ्यावर पदर घेतला होता. 

कृती यांनी एखाद्या सामान्य रुग्णाप्रमाणे कागद तयार केला आणि डॉक्टरला दाखवला. यादरम्यान त्यांना अनेक त्रुटी जाणवल्या. इतकंच नाही तर तेथील अनेक औषधांवर एक्स्पायरी डेट उलटून गेल्याचं आढळलं. कृती यांचा तपासणी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

अखिलेश यादव काय म्हणाले आहेत?

सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून, आरोग्य व्यवस्थेवरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. अखिलेश यांनी एक्सवर कृती यांचा व्हिडीओ शेअर केला असून लिहिलं आहे की, "पदर डोक्यावर घेत उत्तर प्रदेशच्या आरोग्य व्यवस्थेवरील पडदा हटवून सत्य जगासमोर आणणाऱ्या या महिला अधिकाऱ्याला आता सांभाळून राहावं लागणार आहे. अन्यथा, डॉक्टर आणि औषधांविना चालणाऱ्या राज्यातील आजारी वैद्यकीय व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा खुलासा करून लाजलेलं भाजपा सरकार त्याचे ज्ञान वाढवण्याच्या नावाखाली परदेशात अभ्यासासाठी पाठवू शकते".

अखिलेश यादव यांनी पुढे म्हटलं आहे की, "या खुलासा झाल्यानंतर आरोग्य मंत्र्यांची अवस्था खराब आहे. आता एक्स्पायरी डेटच्या औषधाने रुग्णाला बरं करणाऱ्यासाठी जुमांटी (जुमला+गॅरंटी) देणाऱ्या भाजपाचं सरकारची एक्स्पायरी डेटही जवळ आली आहे".

एसडीएमने काय म्हटलं आहे?

आयएएस अधिकारी कृती राज यांनी या कारवाईबद्दल सांगितलं आहे की, त्यांना आरोग्य केंद्राबाबात तक्रारी मिळाल्या होत्या. जे लोक अँटी रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी येतात त्यांना योग्य वागणूक दिली जात नव्हती. लोक 10 वाजल्यापासून रांग लावून वाट पाहत असताना डॉक्टरांना मात्र काहीच माहिती नव्हती. यामुळेच मी सत्यस्थिती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. 

कृती राज यावेळी डोक्यावर पदर घेऊन पोहोचल्या होत्या. त्यांनी रांग लावून पावती घेतली आणि डॉक्टरला दाखवली. यावेळी त्यांना त्रुटी जाणवल्या. रजिस्टर तपासण्यात आलं असता अनेक कर्मचारी गायब होते. काहींची स्वाक्षरी होती, पण ते कामावर हजर नव्हते. 

औषधांचा साठा तपासला असता त्यात अनेक औषधांची एक्स्पायरी डेट संपली होती. स्वच्छताही नीट नव्हती. शौचालय, बेडशीटही स्वच्छ नव्हते. इंजेक्शन योग्य पद्धतीने दिले जात नव्हते. सध्या मी हे सर्व मुद्यांची नोंद करुन अहवाल दाखल केला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.