मुख्यमंत्र्यांच्या मुलावर आरोप करणं राहुल गांधींना पडलं भारी

या चुकीमुळे राहुल गांधींना चढावी लागणार कोर्टाची पायरी

Updated: Oct 30, 2018, 03:57 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या मुलावर आरोप करणं राहुल गांधींना पडलं भारी title=

भोपाल : काँग्रेसला विजयी करण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरलेले पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांना एक कन्फ्यूजनमुळे कोर्टात जाण्य़ाची वेळ येऊ शकते. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा मुलगा कार्तिकेय चौहानने पनामा घोटाळ्यात त्याचं नाव घेतल्याने राहुल गांधींवर अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.

सोमवारी झाबुआ येथील रॅलीमध्ये राहुल गांधी यांनी पनामा आणि व्यापमंवर टीका करताना मुख्यमंत्री शिवराज सिंह यांचा मुलगा कार्तिकेयवर देखील आरोप केले होते. राहुल गांधी यांच्या आरोपानंतर लगेचच प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कोर्टात जाणार असल्याचं ट्विट केलं. राहुल गांधी यांनी त्यांच्याकडून झालेल्या चुकीवर स्पष्टीकरण देताना म्हटलं की, भाजपमध्ये इतका भ्रष्टाचार आहे की, मी कन्फ्यूज झालो. 

राहुल गांधींनी म्हटलं की, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पनामा नाही केला. त्यांनी ई-टेंडरिंग आणि व्यापमं घोटाळा केला आहे. राहुल यांच्या वक्तव्यानंतर शिवराज सिंह चौहान यांचा मुलगा कार्तिकेयने 48 तासाच्या आत माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला.

राहुल गांधी यांनी आपली चूक मान्य केल्यानंतर ही कार्तिकेयने राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली आहे. न्यायाधीश सुरेश सिंह यांच्या कोर्टात कार्तिकेयने राहुल गांधींविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. 3 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता यावर सुनावणी होणार आहे. पुरावा म्हणून कार्तिकेय चौहान यांच्या वकिलाने कोर्टात वृत्तपत्राची कात्रणं आणि टीव्ही न्यूज चॅनेलचं फुटेज सादर केलं आहे.