गुजरातमधल्या सगळ्या जागा राष्ट्रवादी लढणार

काँग्रेससोबतच्या चर्चा अपयशी ठरल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस गुजरात विधानसभेच्या सगळ्या १८२ जागा लढणार आहे.

Updated: Nov 20, 2017, 09:07 PM IST
गुजरातमधल्या सगळ्या जागा राष्ट्रवादी लढणार  title=

अहमदाबाद : काँग्रेससोबतच्या चर्चा अपयशी ठरल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस गुजरात विधानसभेच्या सगळ्या १८२ जागा लढणार आहे. २००७ आणि २०१२ च्या निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीनं गुजरातमध्ये आघाडी करून निवडणुका लढल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसनं जास्त जागा मागितल्यामुळे आघाडी तुटल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.

गुजरातमध्ये आम्ही सगळ्या १८२ जागांवर लढणार आहोत. लवकरच आम्ही उमेदवारांची घोषणा करू, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिलं आहे. काँग्रेससोबत आघाडी न करता निवडणूक लढवणं चांगलं असल्याचं पटेल म्हणाले.

काँग्रेसनं रविवारी ७७ जागांच्या उमेदवारांची घोषणा केली होती. या पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं मागणी केलेल्या जागांचाही समावेश होता. पण राष्ट्रवादीनं गुजरातमधली स्वत:ची स्थिती पाहून जागांची मागणी करायला हवी होती, असं वक्तव्य काँग्रेस नेते अशोक गहलोत यांनी केलं आहे.  गुजरातमध्ये ९ डिसेंबर आणि १४ डिसेंबर या दोन दिवशी निवडणुका होणार असून १८ डिसेंबरला निकाल लागणार आहेत.

गुजरात निवडणुकीबाबत शरद पवारांचं भाकीत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गुजरातमध्ये काँग्रेससोबत विधानसभा निवडणूक लढेल, असं पवारांनी सांगितलं होतं, पण जागा वाटपाचा तिढा न सुटल्यामुळे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार आहेत.

गुजरातमधली स्थिती ही काँग्रेससाठी अनुकुल असल्याचं शरद पवार म्हणाले होते. तसंच गुजरातमध्ये जोरदार प्रचार करणाऱ्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचंही पवारांनी कौतुक केलं होतं.