महाराष्ट्रात विज कोसळून दोन दिवसांत 7 जणांचा मृत्यू

विजेच्या तडाख्याने 40 मेंढ्यांचाही मृत्यू झाला आहे. 

Updated: Apr 17, 2019, 12:52 PM IST
महाराष्ट्रात विज कोसळून दोन दिवसांत 7 जणांचा मृत्यू title=

मुंबई : महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि विज कोसळल्याने गेल्या दोन दिवसांत 7 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. नाशिकमधील सटाणामध्ये विज कोसळल्याने पिंटू शिंदेचा मृत्यू झाला आहे. पावसात भिजणाऱ्या आपल्या बकऱ्यांना सोडण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या देवळा तालुक्यातील वाजगाव येथे राहणाऱ्या हौसा कुंवर या वृद्ध महिलेचाही विज कोसळल्याने मृत्यू झाला आहे. 

परभणीतील पाथरी गावात विज कोसळून दोन जणांचा बळी गेला आहे. तसेच विजेच्या तडाख्याने 40 मेंढ्यांचाही मृत्यू झाला आहे. एक धनगरही या तडाख्यात जखमी झाला आहे. धनगर आपल्या मेंढ्यांना घेऊन एका झाडाखाली उभा होता. त्याचवेळी विज कोसळल्याने ही दुर्दैवी घटना घडली.

येडगाव जुन्नर येथील भोरवाडी येथे महेश दशरथ भोर या युवकाच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. महेश त्यांच्या अंगणात झोपले असताना अचानक पाऊस सुरु झाला. पाऊस सुरु झाल्याने घरात जात असतानाच वीज कोसळली. त्यातच 28 वर्षीय महेशचा होरपळून मृत्यू झाला. नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात महेशचा मृतदेह पाठवण्यात आला आहे. 

नाशिकमधील मालेगाव येथे तुफान वादळी वाऱ्यामुळे मालेगाव कॅम्प भागात एक झाडं पडल्याचीही घटना घडली. या घटनेत विकास अग्रवाल या 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच अमहदनगर जिल्ह्यातील शिर्डीपासून काही अंतरावर असलेल्या संगमनेर तालुक्यातील खराडी गावातही बाळासाहेब साबळे यांचा मृत्यू झाला आहे.