बारसू रिफायनरीला होणारा राजकीय विरोध मावळतोय? उद्धव ठाकरे, अजित पवारांची सावध भूमिका

रिफायनरीचा प्रकल्प चांगला असेल तर लाठ्या-काठ्या कशाला? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे आहे. तर विकासाला राष्ट्रवादीचा विरोध नाही मात्र पर्यावरणाचा ऱ्हास नको अशी सावध भूमिका अजित पवारांनी घेतली आहे.

Updated: Apr 27, 2023, 04:20 PM IST
बारसू रिफायनरीला होणारा राजकीय विरोध मावळतोय? उद्धव ठाकरे, अजित पवारांची सावध भूमिका title=

Barsu Refinery News : बारसू रिफायनरी विरोधातील आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. अजूनही आंदोलक बारसुच्या सड्यावर ठाण मांडून बसलेत. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा प्रशासन, पोलीस अधीक्षक, रिफायनरी विरोधक, रिफायनरी समर्थक आणि तज्ज्ञ मंडळी यांच्यात एक संयुक्त बैठक राजापूरच्या तहसील कार्यालयामध्ये होणार आहे. या बैठकीला तडीपार केलेल्या नेत्यांनाही बोलवण्यात यावं अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. आमच्या नेत्यांना जिल्ह्यातून हद्दपार केलं तर बैठकीत मुद्दे कोण मांडणार अशा प्रकारचा सवाल ग्रामस्थांनी विचारलाय. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर बारसू परिसरात (Ratnagiri Barsu) पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलाय.  याठिकाणी कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी संचारबंदी देखील घोषित करण्यात आलेय. 

राजकीय विरोध मावळला?
कोकणातल्या बारसूमधल्या रिफायनरीला होणारा राजकीय विरोध आता मावळत चाललाय की काय असं चित्र दिसतंय. जर प्रकल्प चांगला असेल तर आंदोलकांवर लाठ्या काठ्यांचा वापर कशाला? असा सवाल उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केलाय. लोकांना विश्वासात घेऊन प्रकल्पाचे फायदे पटवून द्या अशी भूमिका त्यांनी मांडली. तर विकासाला राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) विरोध नाही. मात्र पर्यावरणाचा ऱ्हास नको अशी सावध भूमिका अजित पवारांनी (Ajit Pawar) मांडलीय. 

काय म्हटलंय उद्धव ठाकरेंनी
बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. नाणारला आपण विरोध केला कारण राजापूरमधील एका कार्यक्रमात मला मंचावर येऊन आंदोलनात साथ देण्यासाठी लोकांनी विनंती केली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर दिल्लीतून सतत हा प्रकल्प राबवा असं सांगितलं जात होतं. यानंतर मी प्राथमिक अहवाल घेत हा प्रकल्प कुठे राबवला जाऊ शकतो हे पाहिलं. बारसूची जागा समोर आल्यानंतर तेथील लोकांनी ठराव मंजूर केल्याचं सांगण्यात आलं. पण आता लोकांच्या टाळक्यावर काठ्या मारुन प्रकल्प चांगला असल्याचं का सांगितलं जात आहे? हिताचा प्रकल्प असेल तर जबरदस्ती कशासाठी? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. 

मातोश्रीत उद्धव ठाकरेंची भेट
बारसूतल्या रिफायनरीचा वाद चांगलाच पेटलाय. एकीकडे बारसूत स्थानिकांनी ठिय्या दिलाय. तर दुसरीकडे काही आंदोलकांनी मातोश्रीवर येत उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी आपण स्थानिकासोबत आहोत असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांना दिलं. दुसरीकडे बारसूतल्या भूमिपुत्रांना विश्वासात घेऊनच प्रकल्प पुढे नेणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलंय. 

ग्रामस्थ आक्रमक
बारसू रिफायनरीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. बारसूमधील महिलांनी रस्त्यावर झोपत आंदालन केलं. त्यामुळे आज चार दिवसांनंतरही परिसरात तणावाचं वातावरण आहे. हा प्रकल्प आम्हाला नकोच, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. विरोध मोडून काढण्यासाठी पोलीस कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. पोलिसांच्या बळाचा वापर करुन किंवा शेतकऱ्यांना भिती घालून आपण प्रकल्प करु शकतो, अशी जर सरकारची मानसिकता असेल तर याद राखा!  शेतकरी कुठलाही असेल? तर आम्ही सर्व एक आहोत. याचं भान ठेवून पावलं उचला, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.