स्वप्न साकार! स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव दिनी कुरवंडे इथली धनगर वस्ती प्रकाशमय

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात धनगर वस्तीचं स्वप्न झालं पूर्ण   

Updated: Aug 16, 2022, 07:38 PM IST
स्वप्न साकार! स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव दिनी कुरवंडे इथली धनगर वस्ती प्रकाशमय title=

चैत्राली राजापुरकर, झी मीडिया, लोणावळा :  देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव दिन साजरा होतोय. तर दुसरीकडे पंच्याहत्तर वर्षात अजूनही ग्रामीण भाग नागरिक मूलभूत सुविधापासून वंचित आहेत. पुणे मुंबईकरांची नाळ जोडलेल्या लोणावळाच्या दुर्गम भागात कुरवंडे गावातील धनगर वस्ती ही त्यापैकीच एक. 

या वस्तीवर जेमतेम दहा बारा घरं. मात्र इथे ना वीज ना रस्ता आहे. पिण्याच्या पाण्याचं तर दुर्भिक्षच आहे. पाण्यासाठी वणवण ही तर त्यांच्या पाचवीलाच पुजलेली. वस्तीवर वीज तर दूरच. विद्यार्थ्यांना रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास करावा लागतो. शाळेची पायपीट झाली की घरात अंधाऱ्या खोलीत टिमटीमत्या दिवाच्या अंधुक प्रकाशात स्वतःच्या उज्वल भविष्याची स्वप्ने रंगावी लागत होती.

या कुरवंडे धनगर वस्तीतील नागरिकांनी अनेक सरकारी दरबारात मूलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून खेटा घातल्या. अनेक आमदार खासदार मावळ भागाचे प्रतिनिधित्व करून गेले. मात्र कोणीच या वस्तीकडे लक्ष दिलं नाही. फक्त मतांचे राजकारण केलं गेलं. 

धनगर वस्ती उजळली
अखेर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात धनगर वस्तीचं स्वप्न पूर्ण झालं आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर या वस्तीवर वीजपुरवठा झाला आणि वस्तीतील घर अन् घर वीजेच्या दिव्यांनी उजळून निघाले. डीपीडिसी योजनेतून बारा लाख खर्च करून महावितरण मार्फत या अंधारमय वस्तीला प्रकाशमय करण्यात आलं. 

त्यामुळे इथल्या ग्रामस्थांनी आमदारांचे आभार मानत फ्लेक्स लावला आणि फटाक्यांची आतिषबाजी करून आमदार सुनील शेळके यांचं मनोमन आभार मानले. खऱ्या अर्थाने या धनगरांच्या वस्तीवर वीज आणून 75 वर्षाच्या सुवर्णमहोत्सवी कालावधीत कधी न मिळणारा वीजेच्या उजेडात जीवन उजळून निघालं

मुंबई-पुणेसारख्या दोन शहरांच्या मध्यांवर असलेल्या मावळ तालुक्यातील पर्यटन नगरी म्हणून जगात अधिराज्य गाजविणार्‍या लोणावळा शहराच्या बाजुला हे कुरवंडे गाव. यातील या धनगर वस्तीत सुमारे पाच पिढ़यानीं वीज कधीच बघितली नाही. तंत्रज्ञानाच्या काळात देखील इथले नागरिक अंधारातच जीवन जगत होते

पण आता गावात वीज आल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव आहेत.

धनगर वस्तीवर विद्युत पुरवठा करण्यासाठी 28 विजेचे खांब, विद्युत वाहक तारा आणि 63 केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षा निमित्त याचं उद्घाटन करून धनगर वस्तीवर विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला 
आहे.