VIDEO : सलाम यांच्या कार्याला! महावितरणला लाखोली वाहण्याआधी एकदा पाहा

राजापूर तालुक्यात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे

Updated: Jul 12, 2021, 07:59 PM IST
VIDEO : सलाम यांच्या कार्याला! महावितरणला लाखोली वाहण्याआधी एकदा पाहा title=

राजापूर : वीज प्रवाह खंडित झाला की महावितरणच्या नावाने लाखोली सुरू होते. पण त्यांचं काम किती अवघड असतं,  जीवावर बेतणारं असतं, याची आपल्याला कल्पना येत नाही. पण कोकणातील राजापूरमधल्या या व्हिडिओने याचा आपल्या थोडा अंदाज येईल.

रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील मोसम या गावात पूर आला होता. तिथल्या एका खांबावर संपूर्ण गावाचा वीज पुरवठा अवलंबून होता. अशा परिस्थितीत छातीपर्यंतच्या पाण्यातून जाऊन रुपेश महाडिक या कर्मचाऱ्याने त्या खांबावरचा खटका सुरु केला.

राजापूर तालुक्यात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राजापूर शहरासह अनेक ठिकाणी पूर आला आहे. तालुक्यातील मोसम या गावातही पूर आला आहे. तेथून पुढच्या काही गावांमध्ये वीज वाहिनी सदोष होती. त्यामुळे वीज खंडित करुन काम सुरू होतं. मात्र, सोमवारी काम पूर्ण होईपर्यंत मोसम गावात पूर आला. जेथे पुरवठा सुरू करण्याचा खटका आहे, त्या बनवाडीतील खांबानजीक काही फूट पाणी वर चढलं आहे. 

मात्र तेथील खटका सुरू झाला नाही तर पुढची गावे अंधारातच राहतील. त्यामुळे महावितरणच्या केळवली विभागात काम करणारे रुपेश महाडिक, दर्शन जोगले या दोघांनी धाडस केले. रुपेश महाडिक छातीपर्यंतच्या पाण्यातून खांबापर्यंत गेला आणि त्याने खटका सुरू करुन पुढची गावे प्रकाशमान केली.