भाजप सरकार एक्सप्रेस-वे टोलमुक्त करणार का?

आयआरबीकडे एक्स्प्रेस वे आणि जुन्या मुंबई - पुणे हायवेच्या टोल वसुलीचं काम आहे

Updated: Jul 17, 2019, 11:26 PM IST
भाजप सरकार एक्सप्रेस-वे टोलमुक्त करणार का?  title=

नितीन पाटणकर, झी २४ तास, मुंबई : मुंबई-पुणे प्रवास सुखाचा आणि टोलमुक्त होणार का? याची उत्सुकता आहे. कारण या मार्गावरचं टोलवसुलीचं कंत्राट पुढच्या महिन्यात संपतंय... पण ही एवढी साधी सरळ बातमी नाही... तर त्यामध्ये अजून एक गोंधळ आहेच. सत्तेत आल्यावर भाजपा सरकारनं अनेक रस्त्यांवरची टोल वसुली थांबवली.  मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचा करार पुढच्या महिन्यात म्हणजे संपतोय. त्यामुळे आता तरी सरकारने टोल वसुली थांबवावी, अशी मागणी होतेय.

आयआरबीकडे एक्स्प्रेस वे आणि जुन्या मुंबई - पुणे हायवेच्या टोल वसुलीचं काम आहे. आयआरबी २००४ पासून ही टोल वसुली करतेय... आणि वसुलीचा आकडा २०१६ मध्येच गाठला गेलाय, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी माहितीच्या अधिकारातून मिळवलीय. 

आता एमएसआरडीनं टोल वसुलीसाठी नवीन टेंडर काढलंय. त्यानुसार सुरुवातीला तीन महिन्यांसाठी एक्स्प्रेस-वे वरील टोल वसुलीचं काम दिलं जाणार आहे. तीन महिन्यात पुन्हा नवीन टेंडर काढलं नाही तर याच टेंडरला पुढचे कितीही महिने मुदतवाढ दिली जाऊ शकते. त्यामुळे भाजपा सरकारनं लवकरात लवकर मुंबई-पुणे एक्सप्रेसवे टोलमुक्त करावा ही मागणी वाढतेय.