आबा तुम्ही वाचला असतात हो....! - अजित पवार

तरूणांना व्यसनांच्या उंभरठ्यावरून परत फिरवत हजारो कुटुंबांचे संसार माजी गृहमंत्री आर. आर.पाटील यानी वाचवले. पण, त्यांना स्वत:लाच व्यसन सोडता आले नाही.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 13, 2018, 11:20 AM IST
आबा तुम्ही वाचला असतात हो....! - अजित पवार title=

पुणे : हुक्का पार्लर आणि डान्सबारवर बंदी घालून तरूणांना व्यसनांच्या उंभरठ्यावरून परत फिरवत हजारो कुटुंबांचे संसार माजी गृहमंत्री आर. आर.पाटील यानी वाचवले. पण, त्यांना स्वत:लाच व्यसन सोडता आले नाही. दुर्दैवाने त्यांना झालेल्या कॅन्सरची लक्षणेही वेळेत कळली नाहीत. अन्यथा आबा वाचले असते, असे भावोद्गार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.

कॅन्सर साक्षर व कॅन्सरमुक्त अभियान

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई व पुणे जिल्हा परिषद यांच्या वतीने दिवंगत आर. आर. पाटील (आबा) कॅन्सर साक्षर व कॅन्सरमुक्त अभियान चालवले जात आहे. या अभियानाची सुरूवात वानवडी येथून रविवारी करण्यात आली. या वेळी प्रारंभपर भाषण करताना अजित पवार बोलत होते.

तरूणांनी व्यसनांपासून दूर रहावे

पुणे-मुंबईसारख्या शहरांना व्यसनांचा विळखा पडत आहे. या शहरांमध्ये हुक्का पार्लरची नवीच संस्कृती निर्माण होताना दिसत आहे. दुर्दैवाने केवळ मुलेच नव्हे तर, तरूण मुलीही मोठ्या प्रमाणात अशा प्रकारची व्यसने करत आहेत. तंबाखूजन्य पदार्थांच्या अती आणि सातत्यापूर्ण सेवनामुळे कॅन्सरसारख्या रोगाची लागन होण्याचा धोका असतो. त्यामुळे वेळीच सावध होत तरूणांनी व्यसनांपासून दूर रहावे, असा वडिलकीचा सल्ला अजित पवार यांनी दिला.

सर्वांककडेच पवार साहेबांसारखी इच्छाशक्ती नसते

दरम्यान, अलिकडील काळात झालेल्या वैद्यकीय संशोधणामुळे पहिल्या टप्प्यातील कॅन्सर बरा होऊ शकतो. यासाठी शरद पवार साहेबांचे उदाहरण घेता येईल. त्यांनी योग्य वैद्यकीय उपचार आणि केवळ इच्छाशक्तिच्या जोरावर कॅन्सरवर प्रभुत्व मिळवले. पण, पवार साहेबांसारखी दुर्दम्य इच्छाशक्ती सर्वामध्येच असते असे नाही, असेही पवार यांनी या वेळी सांगितले.