भुजबळांना रोखा जरांगेंची मागणी, तर आमदारांची घरं कुणी पेटवली? भुजबळांचा सवाल

Maratha vs OBC Reservation : छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातील वाद आता चांगलाच पेटलाय. जातीवाचक बोलणाऱ्या भुजबळांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तर बीडमध्ये आमदारांची घरं कोणी पेटवली असा सवाल भुजबळ यांनी केला आहे. 

राजीव कासले | Updated: Nov 27, 2023, 06:44 PM IST
भुजबळांना रोखा जरांगेंची मागणी, तर आमदारांची घरं कुणी पेटवली? भुजबळांचा सवाल title=

Maratha vs OBC Reservation : छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) विरुद्ध मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) या वादानं आता टोक गाठलंय. हिंगोलीत झालेल्या ओबीसी मेळाव्यात भुजबळांनी पुन्हा एकदा जरांगेंना टार्गेट केलं. तर जरांगेंनीही भुजबळांवर जोरदार पलटवार केलाय. जातीवाचक बोलणाऱ्या भुजबळांमुळं वातावरण दूषित होतंय. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी जरांगेंनी केली. दलितांबद्दल पुळका आलेल्या भुजबळांनीच दलितांच्या मोर्चानंतर हुतात्मा चौक गोमूत्रानं धुतला होता, या इतिहासाची आठवणही जरांगेंनी करून दिली.  

तर बीडमध्ये आमदारांची घरं कोणी पेटवली, जाळपोळ करणाऱ्यांना सोडण्याची मागणी कोणी केली? असा सवाल करत भुजबळांनी जरांगेंवर पलटवार केला. इतकंच नाही तर मराठा कुणबी नोंदी शोधणाऱ्या न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीवरून (Shinde Samiti) वादाची ठिणगी पेटलीय... राज्य सरकारनं नेमलेल्या या समितीच्या विरोधात अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळांनीच आक्रमक पवित्रा घेतलाय. शिंदे समिती बरखास्त करण्याची मागणी त्यांनी हिंगोलीतल्या ओबीसी मेळाव्यात केली. या मागणीवरून सरकारमधील मंत्र्यांमध्येच एकवाक्यता नसल्याचं आता स्पष्ट होतंय.

ओबीसी मेळाव्यात भुजबळांनी जरांगेंचा नवे नेते असा उल्लेख केला.  त्यावर जुनाट नेते म्हणत जरांगेंनी भुजबळांवर टोलेबाजी केली. भुजबळांचा आयुष्यभर विदूषकपणा सुरु आहे अशी टीका जरांगेंनी केली. तर जरांगेच विदूषणकपणा करत असल्याचा पलटवार भुजबळांनी केला. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी मनोज जरांगे आणि छगन भुजबळ सोडत नाही.. त्यांच्यातल्या या वादाला मराठा विरुद्ध ओबीसी असं वळण लागण्याची शक्यता आहे... पुरोगामी महाराष्ट्राला हा संघर्ष शोभणारा नाही. 

स्वराज्य संघटनेची एन्ट्री
दरम्यान, भुजबळ-जरांगे वाद सुरु असतानाच आता या वादात स्वराज्य संघटनेची एन्ट्री झाली आहे.  छगन भुजबळ दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असून ते पुण्यातल्या विश्रामगृहात मुक्कामी आहेत. स्वराज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट या विश्रामगृहात धडक मारत भुजबळांना इशारा दिलाय.  भुजबळांनी सबुरीने घ्यावं नाहीतर गाडीही फोडू असा इशारा स्वराज्य संघटनेच्या धनंजय जाधव यांनी दिलाय.. दरम्यान मनोज जरांगे यांनी मात्र सर्व मराठा बांधवांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय.. तर स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते विश्रामगृहात कसे घुसले याची चौकशी करणार असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

केसरकरांनी जरांगेंना सुनावलं
महाराष्ट्रात आज विद्वेष भडकवण्याचं काम सुरू आहे. हे राज्याच्या हिताचं नाही. नाव न घेता दीपक केसरकरांनी मनोज जरांगेंना सुनावलंय. एक लाख नोक-यांमध्ये पाच-दहा हजार जागा राखीव असतील. त्यासाठी महाराष्ट्र पेटवायचा का असा सवाल त्यांनी केलाय.