एका जीवाची किंमत... फक्त चार सफरचंद!

पोलिसांनी १५ जणांविरोधात दंगल घडवणे, हत्या करणे, अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केलेत

Updated: May 17, 2018, 10:36 PM IST
एका जीवाची किंमत... फक्त चार सफरचंद! title=

जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : लग्नाच्या सोहळ्यातून केवळ चार सफरचंद चोरल्याच्या आरोपातून एका युवकाला जबर मारहाण करत ठार मारण्यात आलं. पोलिसांनी दोघांना अटक केलीय. मात्र गर्भश्रीमंत असलेल्या घरातल्या व्यक्तीने चार सफरचंदांसाठी एकाचा जीव घेण्याचा हा प्रकार पाहून सुन्न व्हायला होतंय. ३० वर्षांचा स्वप्नील डोंगरे... त्याच्या आईचा एकुलता एक आधार... आता या जगात नाही... केवळ चार सफरचंदांसाठी त्याचा जीव घेण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून लग्न समारंभात तो केटरिंगच्या कामात फ्रूट सलाडच्या स्टॉलवर काम करत होता. ३ मे या दिवशी तो नागपूरच्या क्वेटा कॉलनीत पाटीदार भवन इथे वाघेला कुटुंबीयांच्या लग्न समारंभात फ्रूट स्टॉलवर काम करत होता. साडे अकरा वाजता समारंभ संपल्यावर उरलेल्या फळातली चार सफरचंद स्वप्नीलने बाजूला काढून ठेवली. वाघेला कुटुंबातल्या काही जणांनी ते पाहीलं आणि स्वप्नीलला बेदम मारहाण केली. या मारहाणीने स्वप्नीलला अंतर्गत जखमा झाल्या. सहकाऱ्यांनी स्वप्नीलला वाचवण्याचे प्रयत्न केले... मात्र त्यांनाही वाघेलांनी मारहाण केल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. 
 
जबर मारहाणीमुळे आतडं आणि यकृताला जबर दुखापत झाली. रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. अखेर 10 मे या दिवशी स्वप्नीलचा मृत्यू झाला. पोलिसांनी १५ जणांविरोधात दंगल घडवणे, हत्या करणे, अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केलेत. योगेश वाघेला आणि रसिक वाघेला या दोघांना अटकही करण्यात आलीय. 

चार सफरचंद चोरली म्हणून वाघेलांनी कायदा हाती घेत स्वप्नीलला बेदम मारहाण केली... त्याचा जीव घेतला... सफरचंद चोरल्याबाबत आक्षेप असता तर त्याला पोलिसांच्या हवाली केलं असतं... पण क्षणिक राग आणि पैशांची मस्ती यात बुडालेल्या या मतलबी लोकांनी चार सफरचंदांसाठी एका तरूणाचा जीव घेतला... कोणाचाही संताप व्हावा अशीच ही घटना...