नारायण राणे पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर?

काँग्रेस सोडून गेलेले अनेक नेते आज परतीच्या वाटेवर आहेत.

Updated: Jan 21, 2019, 03:48 PM IST
नारायण राणे पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर? title=

मुंबई: आगामी निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले नारायण राणे घरवापसीच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच नारायण राणे यांना भाजपच्या जाहीरनामा समितीमध्ये स्थान देण्यात आले होते. तसेच भाजपच्या पाठिंब्यावर ते राज्यसभेवरही निवडून गेले होते. मात्र, या सगळ्यानंतरही नारायण राणे भाजपमध्ये फारसे समाधानी नाहीत. त्यामुळे काँग्रेसकडून नारायण राणे यांना पुन्हा पक्षात आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. याबद्दल माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परततील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस सोडून गेलेले अनेक नेते आज परतीच्या वाटेवर असल्याचे सांगत पुढील निवडणुकीत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री काँग्रेसचेच दिसतील, असेही त्यांनी म्हटले. त्यामुळे राजकीय वर्तुळाचे कान टवकारले आहेत. 

मात्र, नारायण राणे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यात ३६ चा आकडा असल्यामुळे राणेंच्या घरवापसीविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत. याशिवाय, काँग्रेसमध्ये असतानाही राणे यांना पक्षाच्या संस्कृतीशी जुळवून घ्यायला बरेच कष्ट पडत होते. 

आगामी निवडणुकीत भाजपकडून शिवसेनेसोबत युती करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मात्र, शिवसेनेसोबत युती केल्यास आपण भाजपसोबत जाणार नाही, असा पवित्रा नारायण राणे यांनी घेतला होता. याशिवाय, नाणार प्रकल्पासह अनेक मुद्द्यांवरून राणे यांनी भाजप सरकारवर टीकाही केली होती. या सरकराने कोणतेही आश्वासन पाळले नाही, असेही त्यांनी मध्यंतरी म्हटले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले होते. या सर्व घडामोडी नारायण राणे यांची नाराजी स्पष्ट करणाऱ्या आहेत.

भाजपच्या जाहीरनामा समितीमध्ये नारायण राणे

पाच राज्यातील विधानसभा निकाल भाजपाविरोधात गेल्यामुळे काँग्रेसच्या राज्यातील हालचाली देखील वाढलेल्या पाहायला मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या काँग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सध्या आघाडीमध्ये मतभेद होणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे. तसेच पक्षाची ताकद वाढवण्यासाठी बंडखोर नेत्यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.