उद्धव यांच्या टीकेचा समाचार बांद्र्यात जाऊन घेणार - नारायण राणे

 उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा समाचार  घेणार असल्याचा इशारा राणे यांनी दिला आहे.  

Updated: Oct 18, 2019, 02:45 PM IST
उद्धव यांच्या टीकेचा समाचार बांद्र्यात जाऊन घेणार - नारायण राणे  title=

कणकवली : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्गमध्ये केलेल्या टीकेचा समाचार बांद्र्यात जाऊन घेणार असल्याचा इशारा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी दिला आहे. कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. उद्ध्व यांनी १७ मिनिटांच्या भाषणात १५ मिनीटे माझ्यावर टीका केली. टीका करायची होती तर एवढे दूर येण्याची गरज का होती, असा सवाल राणे यांनी केला.

विधानसभा निवडणुकीत नारायण राणे विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळते आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्याकडून सतत नारायण राणेंवर टीका होत असते. नारायण राणे यांच्यासह नीलेश राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री खास उपस्थित होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्गात सभा घेत राणेंवर जोरदार हल्लाबोल केला होता.

नारायण राणे यांच्यावर शिवसेनेकडून जोरदार टीका करण्यात आली. त्यामुळे सिंधुदुर्गतील राजकीय वातावरण चांगले तापले होते. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला मानत राणेंनी शांत राहणे पसंत केले. शिवसेनेवर टीका करणार का, असे विचारता त्यांनी नंतरचे नंतर बघू. मी आधी काय टीका केली ते पाहतो, असे सांगत विषय टाळला होता.

दरम्यान, मुंबईत आज महायुतीची संयुक्त सभा होत आहे. मात्र या सभेवर पावसाचे सावट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईत बीकेसी इथे होत असलेल्या या संयुक्त सभेला उद्धव ठाकरे आणि सर्व मित्र पक्ष उपस्थित राहणार आहेत. महायुतीचे भव्य शक्तिप्रदर्शन केले जाईल. शरद पवार संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे. पण आघाडीची मात्र संयुक्त सभा होणार नाही, असेच सध्यातरी दिसत आहे. सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांनी हरियाणात सभा घेतल्या. परंतु महाराष्ट्रात घेतल्या नाहीत.