सरकारी अधिकाऱ्यांनीच खाल्लं शेत, भूसंपादनाच्या नावानं लाखों रुपयांची लूट

पुण्यातल्या ठकसेनांचा 'झी २४ तास' इन्व्हेस्टिगेशनमध्ये पर्दाफाश 

Updated: Jan 27, 2022, 08:53 PM IST
सरकारी अधिकाऱ्यांनीच खाल्लं शेत,  भूसंपादनाच्या नावानं लाखों रुपयांची लूट  title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यातल्या आंबेगाव मतदारसंघात दिवसाढवळ्या सुरू भूसंपादन घोटाळा सुरु आहे.  पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खेड ते सिन्नर रस्त्यासाठी सध्या भूसंपादन सुरू आहे.  मात्र बोगस लाभार्थी दाखवून सरकारचे मोजणी अधिकारी, भूसंपादन अधिकारीच सरकारला लाखो रुपयांचा चुना कसा लावतायत, याचा झी २४ तास इन्व्हेस्टीगेशनमध्ये पर्दाफाश झाला आहे. 

भूसंपादनाच्या नावाने लूट
आंबेगावच्या मौजे कळंब गावातील 13,900 चौरस मीटर जागा महामार्गासाठी संपादित करण्यात आली. त्यापोटी रंगनाथ पांडुरंग कानडे यांना 1100 चौरस मीटर जागेसाठी ३६ लाख ३४ हजार २७० रुपये मोबदला देण्यात आला.  तर शंकर पांडुरंग कानडे यांना ९५० चौरस मीटर जागेसाठी ३१ लाख ३८ हजार ६९४ रुपये मोबदला दिला गेला.

मात्र धक्कादायक बाब म्हणजे महामार्गाच्या भूसंपादनात त्यांची एक इंचही जमीन संपादित झालेली नाही. याउलट बबन कानडे आणि गणेश कानडे या दोघा शेतकऱ्यांची जमीन महामार्गासाठी घेतली. मात्र त्यांना अद्याप कवडीचाही मोबदला मिळालेला नाही.

भूमी अभिलेख कार्यालय आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी बोगस लाभार्थ्यांशी साटंलोटं करून लाखो रुपयांचा मलिदा लाटल्याचा आरोप आता होत आहे. या सगळ्याची चौकशी करण्याची मागणी केली जातेय.

याप्रकरणी अलिकडेच जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी झाली, तेव्हा अन्याय झालेल्या शेतकऱ्यांनी उप जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारला. याबाबत भूमि अभिलेख उप अधीक्षक लवकरच आपला अहवाल सादर करणार आहेत.

तर कळंब रस्त्यावर संपादित जमिनीव्यतिरिक्त अतिक्रमण झाल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. इथं चुकीचं काम होत असेल तर दोषींवर कारवाई करू, असं आश्वासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिलं आहे.

राज्यात अनेक सरकारी प्रकल्प आहेत, जिथं प्रकल्प बाधितांना एका पैशाचाही मोबदला मिळालेला नाही. आणि इथं आंबेगावात काही भ्रष्ट अधिकारी नियम, कायदे खुंटीला टांगून, बोगस लाभार्थी दाखवून, स्वतःच्या तुंबड्या भरताना दिसतायत. त्यामुळे योग्य लाभार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत झी २४ तास याचा पाठपुरावा करतच राहणार.