पुणे पोलिसांनी पकडलेले बाईकचोर निघाले दहशतवादी, दोघांनाही अटक; 5 लाखांचं होतं बक्षीस

Pune Crime: वाहन चोरी प्रकरणात पोलिसांनी कोथरुड (Kothrud) परिसरातून दोन दहशतवाद्यांना अटक केलं आहे. तपास करताना त्यांच्याकडे सापडलेली सामग्री ही दहशतवादी असल्याचं दर्शवत होती. याप्रकरणी तपास सुरु असून एटीएसही (Maharashtra Anti Terrorism Squad) सहभागी झालं आहे.    

शिवराज यादव | Updated: Jul 19, 2023, 03:32 PM IST
पुणे पोलिसांनी पकडलेले बाईकचोर निघाले दहशतवादी, दोघांनाही अटक; 5 लाखांचं होतं बक्षीस title=

Pune Crime: पुणे पोलिसांच्या (Pune Police) हाती मोठं यश आल्याची शक्यता आहे. कारण पोलिसांनी वाहन चोरी प्रकरणात अडकलेले दोन चोर हे दहशतवादी निघाले आहेत. पोलिसांनी अटकेची कारवाई केल्यानंतर त्यांच्याकडे दहशतवादी कारवायांशी संबंधित सामग्री सापडली होती. यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारीही कोथरुड (Kothrud) पोलीस ठाण्यात पोहोचले होते. तसंच पुणे पोलिसांसह आता एटीएसही या तपासात सहभागी झालं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या दहशताद्यांची नावं एनआयएच्या यादीत असून, त्यांच्यावर 5 लाखांचं बक्षीस आहे. कोर्टात हजर करण्यात आलं असता दोघांना 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  

पुण्याच्या कोथरुड पोलिसांनी वाहन चोरी प्रकरणात दोघांना ताब्यात घेतल्यानंतर आता दहशतवादी विरोधी पथक (Maharashtra Anti Terrorism Squad) आणि इतर यंत्रणांकडून संयुक्तपणे तपास केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोघांकडे दहशतवादाशी संबंधित सामग्री सापडली आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. 

पोलीस रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना गाडी चोरताना हे दोन्ही आरोपी पोलिसांना सापडले. यानंतर त्यांच्या घरांची झडती घेण्यात आली. कोंढव्यात भाड्याने राहणाऱ्या घऱात पोलिसांना कुऱ्हाड सापडली. तसंच लॅपटॅापमध्ये काही इस्लामिक साहित्य सापडलं आहे. हे दोघेही मूळचे मध्यप्रदेशचे आहेत. 

अटकेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त, सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी कोथरूड पोलीस ठाण्यात पोहोचले होते.  वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही दोघांची चौकशी सुरू आहे. 

18 जुलैला मध्यरात्री 2 वाजून 45 मिनिटांनी कॉन्स्टेबल प्रदीप चव्हाण आणि अमोल हे गस्त घालत असताना त्यांना दोन तरुण बाईक चोरी करताना आढळले होते. पुणे पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, बाईक चोरी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अडवलं होतं. यानंतर त्यांच्या घराची झडती घेण्यासाठी नेण्यात आलं. यादरम्यान ते सतत पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी दोघांना पकडण्यात य़श आलं असून, एकजण फरार आहे. 

पोलिसांनी दोघांच्या घराची झडती घेतली असता जिवंत काडतूस, चार मोबाईल आणि एक लॅपटॉप सापडला. यानंतर दोघेही गंभीर गुन्ह्यात सहभागी असल्याचं वाटत होतं. पुढील तपासात दोघांची ओळख पटली. युनूस आणि इम्रान हे दोघे एनआयएच्या वॉण्टेड यादीत असून, त्यांच्यावर 5 लाखांचं बक्षीस असल्याची माहिती हाती आली.

सध्या एटीएस आणि इतर तपास यंत्रणा संयुक्तपणे चौकशी करत आहेत. तपासादरम्यान, दोन्ही दहशतवाद्यांनी आपण गेल्या 16 ते 17 महिन्यांपासून येथे वास्तव्यास असल्याची माहिती दिली आहे. आम्ही त्यांचा दावा तपासून पाहत आहोत. इतर यंत्रणाही तपासात सहभागी आहेत असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहेत. दरम्यान NIA च्या माहितीनुसार, हे दोन्ही दहशतवादी आयसीस प्रेरित दहशतवादी संघटना 'सुफा'शी संबंधित आहेत. राजस्थानमध्ये गतवर्षी दहशतवादी कट आखल्याप्रकरणी ते वाँटेड होते.