नाशिक पालिकेचे नियोजन शून्य, झोपड्यांमध्ये ५ फुटापर्यंत पावसाचे पाणी घुसले

नाशिक महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना मोठा फटका बसला आहे.

Updated: Sep 4, 2019, 08:23 AM IST
नाशिक पालिकेचे नियोजन शून्य, झोपड्यांमध्ये ५ फुटापर्यंत पावसाचे पाणी घुसले title=
संग्रहित छाया

नाशिक : महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे मालेगावच्या वॉर्ड  नंबर २० मध्ये सर सय्यद अहमद नगर भागातील सुमारे १५०च्यावर झोपड्यामध्ये २ ते ५ फुटापर्यंत  पावसाचे पाणी घुसले. अखेर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी  तातडीने मदतकार्य राबवून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले. महापालिका प्रशासनाने वेळेत न पोहोचल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. विशेष  म्हणजे  वॉर्ड  २० हा महापौर रशीद शेख यांचा वॉर्ड आहे.

या भागातील नैसर्गिक नाला भूमाफियांनी बुजविला. तसेच याच भागातून जाणाऱ्या महापालिकेच्या नाल्यातून शहरातील सर्वच भागातील पाणी जाते. नाल्याची व्यवस्थितीत  सफाई न झाल्याने सायंकाळी झालेल्या पावसाचे पाणी खालच्या बाजूला असलेल्या हाजी मोहमद साबीर मशीद परिसरातील वस्तीमध्ये घुसले. 

जवळपास प्रत्येक घरांमध्ये दोन फुटांपासून पाच फुटांपर्यंत पाणी घुसल्याने अनेकांचे संसार पाण्यात गेले. वेळीच सामाजिक कार्यकर्त्यांनी धाव घेत मदतकार्य राबवून  नागरिकांना तसेच महिला व लहान मुलांना बाहेर काढले. सर्व नागरिकांची एका शाळेत तात्पुरती राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी  परिसराला भेट देऊन जेसीबीच्या साहाय्याने पाणी बाहेर  काढले.