सोनई हत्याकांडप्रकरणी आज दोषींना शिक्षा सुनावली जाणार

सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. या प्रकरणी सोमवारी सहा जणांना दोषी ठरवण्यात आलंय. जानेवारी २०१३ मध्ये प्रेमप्रकरणाच्या संशयावरून हे हत्याकांड घडलं होतं. 

Updated: Jan 18, 2018, 09:31 AM IST
सोनई हत्याकांडप्रकरणी आज दोषींना शिक्षा सुनावली जाणार title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. या प्रकरणी सोमवारी सहा जणांना दोषी ठरवण्यात आलंय. जानेवारी २०१३ मध्ये प्रेमप्रकरणाच्या संशयावरून हे हत्याकांड घडलं होतं. 

काय आहे प्रकरण?

सोनईजवळील गणेशवाडी शिवारातील विठ्ठलवाडी इथं जानेवारी 2013 मध्ये सचिन सोहनलाल ऊर्फ मोहनलाल ऊर्फ सोमलाल घारु, संदीप राजू थनवार आणि राहुल ऊर्फ तिलक राजू कंडारे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. नेवासे फाटा इथल्या त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानमध्ये हे तिघे कामाला होते. स्वच्छतागृहाची टाकी साफ करायची आहे, असं सांगून त्यांना विठ्ठलवाडीला बोलावण्यात आलं.

धनवार आणि कंडारे यांचा खून करून मृतदेह कोरड्या विहिरीत पुरण्यात आले. तर घारु याचे मुंडकं आणि हातपाय अडकित्त्याने तोडण्यात आलं होतं. तोडलेले हातपाय एका कूपनलिकेत टाकून देण्यात आले होते. 

कोण ठरले दोषी?

या तिहेरी हत्याकांड प्रकरणी प्रकाश दरंदले, रमेश दरंदले, पोपट दरंदले, गणेश दरंदले, अशोक फलके, अशोक नवगिरे, संदीप कुर्‍हे यांना अटक करण्यात आली होती. यापैकी अशोक फलकेला निर्दोष ठरवण्यात आलंय. सर्व दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केलीय. 

आज या निर्घृण हत्याकांड घडवणा-यांना जरब बसेल अशी शिक्षा होऊ शकते. वाढती प्रेमप्रकरणे पाहता हा निकाल कायद्यातील आणि ऑनर किलिंग प्रकरणात माईल स्टोन ठरण्याची शक्यता आहे.