मुंबई - गोवा महामार्गावर कोंडी, दुसऱ्या दिवशीही वाहनांच्या रांगा

कोकणात येणाऱ्या पर्यटकांना आज पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आज सकाळी मुंबई गोवा महामार्गावरील  वाहतूक सुरळीत होती.  मात्र दहा वाजल्यापासून पेण ते तरणखोप दरम्यान वाहतूक कोंडी झाली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 24, 2017, 11:57 AM IST
मुंबई - गोवा महामार्गावर कोंडी, दुसऱ्या दिवशीही वाहनांच्या रांगा title=

रायगड : कोकणात येणाऱ्या पर्यटकांना आज पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आज सकाळी मुंबई गोवा महामार्गावरील  वाहतूक सुरळीत होती.  मात्र दहा वाजल्यापासून पेण ते तरणखोप दरम्यान वाहतूक कोंडी झाली आहे.

 विकेंड आणि नाताळ सुटीमुळे कोंडी

महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळताहेत.  यामुळे पर्यटकांचे हाल होताहेत . बेशिस्त वाहन चालकांचा फटका सर्वानाच सहन करावा लागतोय. विकेंड आणि नाताळ सुटीमुळे पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात येत आहेत त्यांना या कोंडीत अडकून राहावं लागतंय. 

महामार्गावर लांबच लांब रांगा

सलग सुट्ट्यांमुळे रविवारचा दिवसही वाहतूक कोंडीचा ठरला आहे.  विकेंड आणि नाताळची सुट्टी यामुळे शनिवारपासूनच मुंबईकर कोकणच्या दिशेने निघाले. पर्यटकांच्या गर्दीमुळे विविध महामार्गांवर तुफान वाहतूक कोंडी शनिवारी पाहायला मिळाली. मुंबई-पुणे, मुंबई-गोवा आणि इस्टर्न एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या जवळपास 8 किमीच्या रांगा पाहायला मिळाल्या. त्यातच मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा बोरघाटाजवळ अपघात झाल्याने वाहन चालकांच्या अडचणीत भर पडली. 

वाहतूक अत्यंत धिम्या गतीने

आता रविवार असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने रस्त्यावर वाहनांत अधिक भर पडली आहे. सध्या तरी मुंबई-पुणे, मुंबई-गोवा आणि इस्टर्न एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी नसली तरी वाहतूक अत्यंत धिमी आहे. बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडी झाल्याचे शनिवारी पाहायला मिळालं. त्यामुळे बाहेर पडणार असाल तर लवकर निघा, शिवाय वाहतुकीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करा आणि शक्य तिथे पर्यायी मार्गांचा वापर करा, असं आवाहन करण्यात येतंय. 

वाहतूक पोलिसांचे प्रयत्न तोकडे पडत असल्याचा या दोन दिवसातील अनुभव आहे. थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर सध्या गर्दी झालीय.