पावसात वाहून गेलेल्या मुलीचा मृतदेह कळवा खाडीत सापडला

मंगळवारी मुंबई-ठाण्याला पावसानं झोडपून काढलं.

Updated: Aug 31, 2017, 08:31 PM IST
पावसात वाहून गेलेल्या मुलीचा मृतदेह कळवा खाडीत सापडला  title=

मुंबई : मंगळवारी मुंबई-ठाण्याला पावसानं झोडपून काढलं.

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाने सुमारे १५ जणांचा बळी घेतला. गेल्या २ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या डॉ. आमरापूरकरांचा मृतदेह आज सकाळी वरळी कोळीवाड्याजवळ सापडला तर साचलेल्या पाण्यातून चालताना बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह कळवा-विटावा खाडीत सापडला आहे. 

दीपाली विशाल बनसोडे असे या मृत तरुणीचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई, ठाणे परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. त्यादिवशी ठाण्यातील कोरम मॉलमध्ये काम करतअसलेल्या 27 वर्षीय दीपाली बनसोडे साचलेल्या पाण्यातून चालत घरी निघाल्या होत्या. 

घर जवळच असल्याने त्यांनीही कंबरेभर पाण्यातून चालण्याचा धोका पत्करला. रस्त्यातून चालताना त्यांचं पतीशी फोनवर बोलणंही झाले  होते. मात्र काही काळाने त्यांच्याशी संपर्क तुटला.

कोरम मॉलजवळच्या नाल्यातून वाहून गेल्यानंतर आज दीपाली बनसोडेंचा मृतदेह कळवा-विटावा खाडीत सापडला आहे. नातेवाईकांनी त्यांची ओळख पटवली असून सिव्हिल रुग्णालयात त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. ठाण्यातील वर्तकनगर पोलिस स्थानकात दीपाली बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती.