'येत्या काही दिवसात मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात', मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा

एमआयएम ही भाजपची बी टीम आहे, एमआयएमबरोबर युती होणार नाही

Updated: Mar 20, 2022, 01:22 PM IST
'येत्या काही दिवसात मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात', मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा title=

मुंबई : येत्या २२ मार्चपासून शिवसेनेतर्फे शिवसंपर्क अभियान राबवलं जाणार आहे. शिवसेनेचे खासदार आणि जिल्हाप्रमुख गावागावत जाऊन शिवसेनेची बांधणी करणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या काही दिवासत मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेचे खासदार आणि जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे. दोन वर्षावर लोकसभा निवडणुका आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसैना पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या.

तुम्हा सगळ्यांना कल्पना आहे राज्यात एका मागून एक घटना घडत आहे मला एका जागी बसावं लागत आहे, गेल्या वेळी आपण शिवसंपर्क अभियान राबविणार होतो मात्र कोरोनाची लाट आली त्यानंतर नेमकं माझं माणेच दुखणं उभं झालं, पण आता येत्या काही दिवसात मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असेन असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.  आणखी काही दिवसात राज्यव्यापी घोषणा करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न करा, असं आवाहनही त्यांनी केलं.

शिवसेनेचे विचार गावा गावात पोहचवणं गरजेचं आहे, शिवसेना काही मतदार संघात पक्ष वाढवणे गरजेचं आहे, आपल्या सोबत भाजपने युती तोडली , भाजप कडे कोणते मतदार संघ आहे, कोणते जिंकले त्या ठिकाणी तयारी करा , त्याची सविस्तर यादी मला द्या , तिथं नव्या जोमाचा उमेदवार तयार करा माझ्याकडे नाव दया असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

एमआयएमबरोब युती नाही
एमआयएम ही भाजपची बी टीम आहे असा आरोप करत एमआयएमबरोबर युती होणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. 

विरोधकांच्या खुरापतींकजे लक्ष
विरोधक काय खुरापती करत आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, विरोधक विरोध करत राहणार पण आता तितक्याच ताकदीनं प्रत्युत्तर दिलं पाहिजे असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलं. विरोधकांची हवा पहिल्या पेक्षा कमी झाली आहे लोकांनाही विरोधकांचे डावपेच लक्षात येत आहेत असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.