खारघर दुर्घटना प्रकरण! आप्पासाहेबांच्या अनुयायांवर भाजपाचा डोळा... उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

खारघर दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आता उद्धव ठाकरे यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. वापरा आणि फेकून द्या हे भाजपचं वैशिष्ट्य असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

Updated: Apr 20, 2023, 06:56 PM IST
खारघर दुर्घटना प्रकरण! आप्पासाहेबांच्या अनुयायांवर भाजपाचा डोळा... उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप title=

Maharashtra Bhushan Award : खारघर दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी विरोधकांनी राज्य सरकारवर (Shinde-Fadanvis Government) जोरदार टीका केली आहे. आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर (BJP) गंभीर आरोप केला आहे. अप्पासाहेब धर्माधिकारींच्या (Appasaheb Dharmadhikari) कार्यक्रमाला लाखो लोकं उपस्थित राहातात. कारण अप्पासाहेब धर्माधिकारींवर जीवपेक्षा जास्त प्रेम करणारी लोकं आहेत, पण ती लोकं केवळ आपले मतदार व्हावेत यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 

या कार्यक्रमाचं नियोजनही अगदी वाईट पद्धतीने करण्यात आलं होतं. ज्यांना तुम्ही मतदार (Voters) बनवू इच्छित होतात, त्यांचा तुम्ही बळी घेतलात असा गंभीर आरोपही उद्धव ठाकरे यांनी केलाय. वापरा आणि फेकून द्या हे भाजपचं वैशिष्ट्य आहे. भाजपाला मतांचं राजकारण करायचं होतं असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

एक सदस्यीयस समितीच स्थापना
खारघर दुर्घटनेप्रकरणी एक सदस्यीय समिती नेमण्यात आलीय. 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार सोहळ्यानंतर उष्माघाताचा त्रास होऊन 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाला. या घटनेच्या संदर्भात वस्तुस्थिती तपासण्याकरिता एक सदस्यीय समिती नेमण्यात आलीय. महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांचा या समितीत समावेश असेल. ही समिती एका महिन्याच्या मुदतीत याबाबतचा अहवाल सादर करेल. तसच भविष्यातील अशा प्रकारच्या समारंभाच्या आयोजनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी, दक्षता घ्यावी, याबाबतही समिती शासनाला शिफारशी करेल. 

संजय राऊत यांचा आरोप
खारघर दुर्घटनेत 50 ते 75 मृत्यू झाल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय...आणि हा मृत्यूचा आकडा सरकार लपवतंय असा गंभीर आरोप करण्यात आलाय...पाण्याविना सरकारने 50 हून अधिक लोकांचे जीव घेतले असून, पाण्यासाठी आंदोलन करणा-यांना जेलमध्ये टाकलं जातंय...खोके सरकारमधील लोक मृतांच्या नातेवाईकांना पैसे देऊन त्यांचं तोंड बंद करताय असाही आरोप राऊतांनी केलाय...तसंच पालघरमधील साधूंच्या हत्येवेळी तांडव करणारे भाजप नेते आता कुठे आहेत...? फडणवीसांची माणुसकी मेलीय का...? मुख्यमंत्री दुर्घटनेबाबत गप्प का...? असे सवाल करत राऊतांनी सरकारवर हल्ला चढवलाय...यावेळी राऊतांनी विशेष अधिवेशन घेण्याची मागणीही केलीय.

पोस्टमार्टम रिपोर्ट
महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमात आतापर्यंत 14 जणांचा बळी गेला...मृत्यू हा उष्माघातानेच झाल्याचं पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलंय...या पैकी एका महिलेचा पोस्टमार्टेम रिपोर्ट झी 24 तासच्या हाती लागलाय...या रिपोर्टमध्ये हा मृत्यू उष्माघातानेच झाल्याचं नमूद करण्यात आलंय...