मुंबईत दररोज दोन महिलांवर होतात बलात्कार, मुंबई सुरक्षित कशी?

पुण्यात घडलेल्या छेडछाडीच्या पार्श्वभुमीवर मुंबईत महिला किती सुरक्षित आहेत याची आता चर्चा होऊ लागली आहे.

Updated: Dec 15, 2017, 08:50 PM IST
मुंबईत दररोज दोन महिलांवर होतात बलात्कार, मुंबई सुरक्षित कशी? title=

अजित मांढरे, झी मिडीया मुंबई : पुण्यात घडलेल्या छेडछाडीच्या पार्श्वभुमीवर मुंबईत महिला किती सुरक्षित आहेत याची आता चर्चा होऊ लागली आहे.

शक्तीमिल सारख्या अंगावर शहारे आणणा-या सामुहिक बलात्काराच्या घटनेनंतर मुंबईतील महिलांच्या सुरक्षेकडे आधीपेक्षा जास्त लक्ष दिले जाईल हे सरकारचे दावे किती खरे ठरलेत याबाबत प्रश्न विचारले जात आहेत. खरंच मुंबईत महिला सुरक्षित आहेत का? याबाबतचा आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांचा हा स्पेशल रिपोर्ट...

 मुंबईत रोज होतो किमान २ मुलींवर बलात्कार... 
 मुंबईत रोज होतो किमान एका महिलेवर आणि एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार 
 मुंबईत रोज होते किमान तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण 
 मुंबईत रोज होते किमान पाच महिलांची छेडछाड 

महानगरी मुंबईचं वास्तव

सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात मुलीच्या छेडछाडीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महानगरी मुंबईत तरी महिला सुरक्षित आहेत का हा मुद्दा चर्चेत आलाय. मुंबई हे महिलांसाठी सुरक्षित शहर मानलं जायचं. पण सध्याची स्थिती काय आहे? अमली पदार्थांच्या तस्कराने मॉडेल कृतिका देसाईची हत्या केल्याची घटना असो किंवा मित्रांसोबत पार्टीला गेलेल्या अर्पिता तिवारी नावाच्या एका तरुणीचा निवस्त्र मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडल्याची घटना असो..अशा घटना मुंबईच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण करतात.. हे शहर खरचं सुरक्षित आहे का? रोज २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, रोज एका महिलेवर बलात्कार, रोज तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण.... हे आहे महानगरी मुंबईचं वास्तव... 

मुंबईतली वाढती गुन्हेगारी 

जानेवारी ते सप्टेंबर २०१७ मध्ये बलात्काराच्या ५२५ घटना, ३१८ अल्पवयीन मुलींवर बलात्कार यातील ८८ गुन्ह्यांची उकल झाली आहे. ९८३ अल्पवयीन मुलींचे आणि १३ महिलांचे अपहरण झाले. अल्पवयीन मुलींच्या ७३१ अपहरणांचा छडा लावण्यात यश आलंय. महिलांच्या १३ पैकी १० अपहरणांचा यशस्वी तपास झालाय. मुंबईत छेडछाडीचे १६०९ गुन्हे दाखल करण्यात आलेत. यातील ११२७ गुन्हांचा तपास करण्यात यश मिळालं. 

जानेवारी ते सप्टेंबरमध्ये ५२५ बलात्काराच्या घटना

२०१७ च्या जानेवारी ते सप्टेंबर या काळात मुंबईत एकूण ५२५ बलात्काराच्या घटना घडल्यात. बलात्कार झालेल्यांमध्ये ३१८ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. यातल्या ८७ टक्के म्हणजे ४५६ गुन्हांचा उलगड़ा करण्यात मुंबई पोलिसांना यश आलंय.
गेल्या ९ महिन्यांमध्ये मुंबईतून ९८३ अल्पवयीन मुलींचे आणि १३ महिलांचे अपहरण झालयं, अल्पवयीन मुलींच्या ७३१ अपहरणांचा पोलिसांनी उलगडा केलाय. तर महिलांच्या १३ पैकी १० अपहरणांचा छडा पोलिसांना लागलाय. तसंच गेल्या ९ महिन्यात मुंबईत तब्बल १ हजार ६०९ महिला छेडछाडीचे गुन्हे दाखल झालेत यापैकी १ हजार २२७ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणलेत.

गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असलं तरी पोलिसांकडे तक्रार केली तर न्याय मिळतो आणि गुन्हेगारांना शासन होतं असा विश्वास मुंबईकरांना वाटतो असा दावा पोलिसांनी केलाय. 

मुंबईतील महिलांची सुरक्षा हा मुद्दा नेहमीच ऐरणीवर राहीलाय... पोलीस त्यांच्या परीने प्रयत्न करताहेत गुन्हेगारांमध्ये पोलीसांविषयी जो धाक असला पाहिजे तो कुठे तरी कमी झालाय का? आणि याचमुळे गुन्ह्यांचे प्रमाण कमी न होता वाढत चाललंय का? वर्दीचा धाक कमी झालाय हा हाच खरा सवाल आहे.