लिलावतीमधल्या फोटोसेशनवरुन नवनीत राणा अडचणीत, शिवसेना आक्रमक

किशोरी पेडणेकर यांनी लीलावती प्रशासनाला धरलं धारेवर

Updated: May 9, 2022, 02:34 PM IST
लिलावतीमधल्या फोटोसेशनवरुन नवनीत राणा अडचणीत, शिवसेना आक्रमक title=

मुंबई : तुरुगांतून सुटका झाल्यानंतर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नवनीत राणा स्पॉन्डिलायसिस (Spondylosis Symptoms And Treatment) या आजाराने त्या त्रस्त आहेत. मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) त्यांचा एमआरआय (MRI) स्कॅन करण्यात आला.

यावेळी नवनीत राणा यांचा एमआरआय कक्षातला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोवरुन शिवेसनेनं लीलावती प्रशासनाला धारेवर धरलं आहे. एमआरआय काढताना फोटो काढलाच कसा? ही परवानगी दिली कुणी...? असे सवाल विचारत राणांच्या एमआरआयचा रिपोर्ट देईपर्यंत हटणार नाही असा इशारा शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी लीलावती प्रशासनाला दिला.

शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर आणि मनिषा कायंदे यांच्यासह शिवसेना नेत्यांनी आज लिलावती रुग्णालयात धडक मारली. नवनीतराणा यांचा एमआरआय खरच झाला आहे का? एमआरआय कक्षात सर्व वस्तू बाहेर ठेवायच्या असातना व्हिडिओ शुटिंग आणि फोटो काढण्याची परवानगी दिली कशी? असे प्रश्न त्यांनी प्रशासनाला विचारले. 

रुग्णालय प्रशासन जोपर्यंत उत्तर देत नाही तोपर्यंत आम्ही रुग्णालयातून बाहेर पडणार नसल्याची भूमिका शिवसेना नेत्यांनी घेतली. त्यामुळे काही काळा गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. 

रुग्णालयात फोटोग्राफी आणि शुटिंगसाठी कोणी दबाव आणला होता का? याची तपासणी झाली पाहिजे अशी मागणी यावेळी शिवसेना नेत्यांनी केली.