अण्णांचा हर्षवर्धन पाटील यांच्यावर हल्लाबोल

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. हर्षवर्धन पाटील यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नसल्याचं अण्णांनी म्हटलंय.

Updated: May 11, 2012, 06:38 PM IST

www.24taas.com, यवतमाळ

 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. सहकार खात्यात मोठा भ्रष्टाचार असून चौकशीच्या नावाखाली सहकार मंत्री त्याला स्थगिती आदेशाद्वारे अभय देत आहेत. त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नसल्याचं अण्णांनी म्हटलंय. मिशन लोकायुक्तसाठी राज्याच्या दौ-यावर असलेले अण्णा हजारे यवतमाळमध्ये आल्यानंतर ते बोलत होते.

 

राज्यातल्या सिंचन क्षेत्रावरून श्वेतपत्रिकेचा वाद सुरु असतानाच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या मुद्द्यावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केलीय. सिंचन, जलसंधारण आणि नवयोजना यावर मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी अण्णांनी केलीय. लोकपालनंतर आता शेतक-यांच्या प्रश्नावर आंदोलन करणार असल्याची घोषणा अण्णांनी केलीय. सहकारातल्या भ्रष्टाचारावरून अण्णांनी सरकारवर पुन्हा निशाणा साधलाय.

 

सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा अण्णांनी पुनरुच्चार केलाय. आपण सहकारक्षेत्रातल्या भ्रष्टाचाराची 188 प्रकरणं दिली होती. मात्र त्याला पाटील यांनी स्थगिती दिल्यानं त्यावर कारवाई होऊ शकली नाही असा आरोप अण्णांनी केलाय. चौकशीच्या नावाखाली ही स्थगिती दिल्याचा दावा अण्णांनी केलाय.