एका सैनिकाच्या लग्नाची गोष्ट

लग्न करायचं झालं तर पंचांग काढा, मुहूर्त शोधा, अशी लगीनघाई सुरू होते... पण ही झाली सर्वसामान्यांच्या लग्नाची गोष्ट... नवरदेव हा देशासाठी सीमेवर लढणारा सैनिक असेल तर... त्याच्या आयुष्यात 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनापेक्षा आणखी चांगला मुहूर्त असूच शकत नाही...

जयवंत पाटील | Updated: Aug 15, 2013, 09:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, उस्मानबाद
लग्न करायचं झालं तर पंचांग काढा, मुहूर्त शोधा, अशी लगीनघाई सुरू होते... पण ही झाली सर्वसामान्यांच्या लग्नाची गोष्ट... नवरदेव हा देशासाठी सीमेवर लढणारा सैनिक असेल तर... त्याच्या आयुष्यात 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनापेक्षा आणखी चांगला मुहूर्त असूच शकत नाही... देशप्रेम नसानसात भिनलेल्या, तुळजापूरच्या एका सैनिकाच्या लग्नाची ही गोष्ट....
स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर सुरू असलेला हा लग्नसोहळा... रस्त्यावरून निघालेली नवरा-नवरीची वरात... लग्नासाठी व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त शोधणारे अनेकजण सापडतील. पण भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर लग्नाच्या मांडवात उभा राहणारा तरूण अपवादानेच आढळेल... तुळजापूर तालुक्यातील मसाला खुर्द गावचा रहिवाशी असलेला श्रीराम महादेव छत्रे त्यापैकीच एक... जम्मू-काश्मीरमध्ये प्राण पणाला लावून भारतीय सीमेचे रक्षण करणारा श्रीराम हा सैन्यातला जवान. पंचांगातला शुभमुहूर्त न पाहता स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच लग्न करायचा संकल्प त्याने तडीस नेला...
विशेष म्हणजे लग्न ठरलं रे ठरलं की, कुठं कुठं जायचं हनिमूनला याची स्वप्न रंगवायला सुरूवात होते. पण देशप्रेमाचा ध्यास घेऊन सैन्यात भरती झालेला श्रीराम इथंही अपवादच ठरला. लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांतच तो पुन्हा भारतमातेच्या रक्षणासाठी ड्युटीवर परतणार आहे... कौतुकाची बाब म्हणजे श्रीरामच्या स्वप्नांना समजून घेणारी सोनालीसारखी नववधू त्याला मिळालीय. लग्नानंतर नव्या आयुष्याची सुंदर स्वप्न पाहणारी ही नववधू नव-याच्या निर्णयाला तितक्याच समर्थपणे साथ देतेय...
तुळजापूर मध्ये झालेल्या या अनोख्या लग्न समारंभाच्या मंगलमय वातावरणा सोबतच देशप्रेमाचे वातावरणही भारावून टाकणार होत. लग्नसमारंभात सहसा न दिसणारा तिरंगा झेंडा हीं श्रीराम –सोनालीच्या लग्नसोहळ्यात अभिमानाने सहभागी झाला होता. आपल्या गावाचा शूर सैनिकाच्या लग्नाला गावकरीही आवर्जून हजर होते. श्रीरामच्या हे देशप्रेम त्यांच्या लहानग्या बहिणीला आणि नातेवाईकांना ही प्रेरणादायी वाटते आहे
वैवाहिक आयुष्याचा शुभारंभ करण्याच्या या पवित्र संस्कार विधीला जगातील सर्वच धर्मात महत्वाचे स्थान आहे.सनई चौघडी च्या मंगलमय वातावरनाला देशप्रेमाची जोड आणि तीही स्वातंत्र्य दिनासारख्या राष्ट्रीय सणाला झालेला हा अनोखा विवाह सोहळा मात्र अनेकांच्या कायम आठवणीत राहील.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.