ब्लॉग: नारायण राणेंचं 'बंड' ते 'बंड'!

Last Updated: Thursday, July 24, 2014 - 11:45
ब्लॉग: नारायण राणेंचं 'बंड' ते 'बंड'!

मुंबई: ऋषी देसाई - नारायण राणे यांनी जाहीर केल्याप्रमाणे मंत्रिपदाचा राजीनामा दिला. खरंतर मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा आणि काँग्रेसच्या गोटातलं समशीतोष्ण राजकारण या सगळ्यामुळं राणे एकटे पडले. राणेंच्या नाराजीला अनेक कारणं आहेत.. काही राणेंनी स्वतःहून ओढवून घेतलीत, तर काही परिस्थितीनं...

नारायण राणेंच्या आक्रमकतेची 9 वर्ष

आक्रमक नेते म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात अशी ओळख असलेल्या नारायण राणे आपल्या आक्रमकपणासाठी आपली राजकीय कारकीर्दच आता पणाला लावलीय. सच्चा शिवसैनिक अशी ओळख असलेल्या नारायण राणेंना शिवसेनेनं भरभरुन दिलं. शिवसैनिक ते मुख्यमंत्री राणेंचा हा प्रवास त्याच्या आक्रमकपणाचीच पावती होती. पण पक्षात घुसमट होतेय असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर तोफ डागत नारायण राणेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि कोकणातले नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाचेच संदर्भ बदलले.

एका बंडापासून दुसऱ्या बंडापर्यतचा प्रवास

हायकमांडकडून मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन ही गोष्ट केवळ राणेंसाठीच नाही तर कोकणसाठी काँग्रेसला बळकट ठरवणारी ठरली. दरारा असणाऱ्या शिवसेनेतून राणेंनी आपल्या समर्थकांना काँग्रेसमध्ये आणत शिवसेनेला तडाखा दिला. आमदार गणपत कदम, शंकर कांबळी, प्रकाश भारसाखळे, कालिदास कोळंबकर, विनायक निम्हण, शाम सावंत, माणिकराव कोकाटे, सुभाष बने, राजा राऊत, आणि विजय वडेट्टीवर यांनी सेनेला जय महाराष्ट्र केला. या आमदारांबरोबरच मुंबई ठाण्यातील नगरसेवक, शाखाप्रमुख यानी राजीनामा दिला आणि अनेक पालिका महापालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषंदामधील समिकरणच बदलू गेली. 

राणेंमुळे काँग्रेसचे संख्याबळ कागदावर वाढत गेलं आणि त्याचवेळी काँग्रेसमध्ये राणेंना एकटे पाडण्याचे राजकारण ही जोरात सुरु होतं. श्रीवर्धन पोटनिवडणूकीनंतर राणेंच्या आत्मविश्वासाला पहिला सुरुंग लावण्यात आला आणि राणेंची काँग्रेसमध्येही घुसमट सुरु झाली. मुख्यमंत्रीपदासाठी राणेंच्या दिल्लीवाऱ्या सुरुच होत्या. पण विलासराव देशमुख यांच्या दिल्ली दरबारी असलेल्या वजनामुळं राणेंचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न हुलकावणी देत राहीलं. मुंबई हल्ल्यानंतर रक्ताळलेला हात म्हणत राणेंनी राजीनामा दिला. 

पण सत्तेच्या मर्यादेमुळं राणेंनी राजीनामा मागे घेत आपली भूमिका मवाळ केली. विलासरावांनतर आलेल्या अशोक चव्हाणांवरही राणे टिकास्त्राचा मारा केला. नाराजीची अशी वारंवार जाहीर वाच्यता करुनही राणेंना मंत्रीपदावरंच समाधान मानावं लागलं. आदर्श प्रकरणात पायउतार झाल्यावर आपली वर्णी लागेल अशी आशा असतानाही हायकमांडनी पृथ्वीराज चव्हाण यांना मुंबईत पाठवल्यानं राणेंसमोर केवळ मंत्रीपदाची सुत्रे हाती घेण्याशिवाय काहीच उरलं नव्हतं. 

समर्थकांसहीत प्रवेश करणाऱ्या राणेंना मागील ९ वर्षात एकही राज्यमंत्रीपद मिळालंच नाही. केवळ राजन तेलींची विधान परिषद आमदारकी आणि पारकरांना महामंडळ याव्यतिरिक्त काहीच लाभलं नाही. त्यावेळी फुटून आलेल्या आमदार समर्थकामंध्ये आता केवळ कालिदास कोळंबकर, माणिकराव कोकाटे आणि विनायक निम्हण एवढेच आमदार उरले आहेत. जयवंत परबांपासून ते अगदी रवींद्र फाटक यांच्यापर्यंत अनेकांनी यापूर्वीच पुन्हा भगवा हाती घेतलाय. 

पण या सगळ्यातही लोकसभा निवडणूकीत निलेश राणेंचा पराभव राणेंच्या जिव्हारी लागला. गेल्या 25 वर्षात पराभव हा शब्द न एकलेल्या राणेंना मुलाचा पराभव सहन झाला नाही. पराभवाची कारणं अनेक होती पण त्यासगळ्याकडे दुर्लक्ष करत राणेंना जवळच्या पदाधिकाऱ्यांवर आणि जिल्हावासियांवरच खापर फो़डत आपला रोष व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीनंतरही राज्यात नेतृत्वबदलाबद्दल हायकमांड गंभीर नसल्यानं राणे आणखीनच चिडले आणि मग राणे कोकण दौऱ्यावर आपल्या समर्थक भेटीसाठी निघाले. 

नऊ वर्षापूर्वीचाच भावनिक साद घालण्याचा राणे यांनी पुरेपुर प्रयत्न केलाय. पण नऊ वर्षांच्या या संघर्षात आणि बंडात खूप फरक पडलाय. त्यावेळी कोकणच्या स्वाभिमानाची लढाई असं चित्र होतं आणि आता स्वाभिमानाची कोकणातली लढाई असं चित्र झालंय. पद माझ्याकडे चालून येतात आणि जर-तर या शब्दावर विश्वास न ठेवणारे नारायण राणे यांची लढाई, आता महत्वाकांक्षा आणि राजकीय खेळीमुळे पुन्हा नऊ वर्षापूर्वीच्याच वळणावर येऊन पोहोचलीय, हे मात्र नक्की.
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 First Published: Wednesday, July 23, 2014 - 20:10


comments powered by Disqus