विल्सन कॉलेजमध्ये बसतात प्रॉक्सी प्राचार्य!

चर्नी रोड इथल्या विल्सन कॉलेजमध्ये प्राध्यापकांसोबतच गैरव्यवहार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. कॉलेजमध्ये चक्क प्रॉक्सी प्राचार्य बसतात आणि याचा प्राध्यापकांना मोठा जाच होतोय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 17, 2013, 06:40 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
चर्नी रोड इथल्या विल्सन कॉलेजमध्ये प्राध्यापकांसोबतच गैरव्यवहार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. कॉलेजमध्ये चक्क प्रॉक्सी प्राचार्य बसतात आणि याचा प्राध्यापकांना मोठा जाच होतोय.
मुंबई विद्यापीठ आणि त्याअंतर्गत अनेक कॉलेजेसमध्ये विविध घोळ सुरु असतानाच आता चर्नी रोडमधल्या नामांकीत विल्सन कॉलेजमधली एक धक्कादायक माहिती समोर आलीय.
कॉलेजमध्ये प्राचार्यांबरोबर चक्क एक अज्ञात व्यक्ती बसते. कॉलेजमधल्या अनेक शैक्षणिक कामांमध्ये त्या व्यक्तीचा हस्तेक्षप असतो. यासंदर्भात कॉलेजच्या प्राध्यापकांनी तक्रार केली तर प्राचार्य प्राध्यापकांना थेट धमकी देतायत.
इतकंच नाही तर कॉलेजमध्ये अनेक गैरप्रकार सुरु आहेत. कॉलेजमध्ये परीक्षा सुरु असताना चक्क कॅम्पसमध्ये शुटिंग चालतं. अनुदानित कोर्सेससाठी असलेल्या प्राध्यापकांना विनाअनुदानीत विषय बंधनकारक करण्यात आले आहेत. या गैरप्रकारांबाबत प्राध्यापकांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत दाद मागितलीय. पण ४५ दिवस उलटून गेले तरी प्राध्यापकांना माहिती मिळालेली नाही.
यासंदर्भात प्राध्यापकांनी मुंबई विद्यापीठ आणि गामदेवी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलीय. विल्सन कॉलेजमधल्या याच मुद्द्यावरुन विद्यापीठाच्या अधिसभेतही गोंधळ झाला. यावेळी कुलगुरु राजन वेळुकर यांनी माहिती घेण्यात येईल, असं आश्वासन दिलंय. विल्सनसारख्या नामांकित कॉलेजबद्दल अशी तक्रार आल्यामुळे शिक्षणाचं बाजारीकरण होतंय, या मुद्द्याला दुजोरा मिळतोय.

एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये हा सगळा गैरप्रकार सुरु असताना आणि त्याबद्दल तक्रारीही आल्या असताना विद्यापीठ आतपर्यंत काय करत होतं? हा प्रश्न यानिमित्तानं समोर येतोय. आता तरी विद्यापीठ गंभीर दखल घेणार का? की नेहमीसारखाच आश्वासनांचा पाढा वाचणार, हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.