पासवर्ड श्रीमंतीचा- 25 ऑगस्ट 2012

शेअरबाजारातले ऑटो, FMCG म्हणजेच ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादन क्षेत्र आणि हेल्थ केअर हे सेक्टर्स सरत्या आठवड्यात तेजीत होते. तर बॅका, कॅपिटल गुड्स, कन्झ्युमर ड्युरेबल्स, आयटी, मेटल, ऑईल एण्ड गॅस, सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या आणि टेक के या क्षेत्रात मंदीसदृष्य वातावरण होतं.

जयवंत पाटील | Updated: Aug 26, 2012, 12:03 AM IST

दिनेश पोतदार, www.24taas.com
शेअरबाजारातले ऑटो, FMCG म्हणजेच ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादन क्षेत्र आणि हेल्थ केअर हे सेक्टर्स सरत्या आठवड्यात तेजीत होते. तर बॅका, कॅपिटल गुड्स, कन्झ्युमर ड्युरेबल्स, आयटी, मेटल, ऑईल एण्ड गॅस, सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या आणि टेक के या क्षेत्रात मंदीसदृष्य वातावरण होतं. आयटी क्षेत्रात सर्वसाधारण उत्साहाचं वातावरण नसलं तरी प्रमुख आयटी कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये वाढ दिसून आली. इन्फोसिस, टीसीएस आणि विप्रो या प्रमुख आयटी कंपन्यांचे स्टॉक्स वधारले होते. फार्मा सेक्टरपैकी सिप्ला कंपनीचे शेअर्स वधारले होते. ऑस्ट्रेलियन मार्केटमध्ये सेवा पुरवण्यासाठी सिप्ला आणि दक्षिण आफ्रिकेच्या एस्पन कंपनीचा करार करण्यात येतोय. FMGG पैकी हिंदुस्तान युनिलिव्हरचे स्टॉक्स वधारले होते. शुक्रवारी इंट्रा डे ट्रेडिंगमध्ये युनिलिव्हरनं उच्चांक नोंदवला. दुसरी FMCG कंपनी ITC चे स्टॉक्सही वधारले होते.
ऑटो स्टॉक्समध्ये सर्वसाधारण तेजी दिसून आली. जुलै महिन्यात कामगारांच्या हिंसाचारामुळे हरयानातल्या मनेसरमधला मारुती सुझुकीचा कारखाना बंद ठेवण्यात आला होता. तो पुन्हा सुरु झाल्यामुळे मारूती सुझुकीचे स्टॉक्स वधारले होते. शेअर बायबॅक प्रोग्रामच्या मर्यादित यशामुळे हेवीवेट रिलायन्सचे स्टॉक्स घसरले होते. तर तांत्रिक कारणामुळे प्रस्तावित शेअर बायबॅक कार्यक्रम राबवता येणार नसल्यामुळे कोल इंडियाचे स्टॉक्स वधारले होते. सेन्सेक्स पॅकच्या 30 कंपन्यांपैकी 21 कंपन्यांचे स्टॉक्स वधारले होते तर उरलेल्या 9 कंपन्यांचे स्टॉक्स घसरले होते. सेन्सेक्स पॅकच्या वधारणा-या कंपन्यांच्या यादीत कोल इंडिया अव्वलस्थानी होती तर घसरणा-या कंपन्यांच्या यादीत भारती एअरटेल अव्वलस्थानी होती. सेन्सेक्स पॅकपैकी, हिंडाल्को इंडस्ट्रीज, लार्सन एण्ड टुब्रो, टाटा स्टील, जिंदाल स्टील, ICICI बॅक, महिंद्रा एण्ड महिंद्रा आणि स्टेट बॅक ऑफ इंडियाचे स्टॉक्स घसरले होते
महिन्यात सलग चौथ्या आठवड्यात बाजारात तेजी होती. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अमेरिका आणि चीन या दोन आर्थिक महासत्तांकडून, चलनविषयक धोरण सैल करण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे, सरत्या आठवड्यात जागतिक स्टॉक्स वधारले होते. त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअरबाजारांवरही झाला. मुंबई शेअरबाजारात सरत्या आठवड्यात सर्वसाधारण 92 अंशांची वाढ दिसून आली. सोमवारी, 20 ऑगस्टला रमझान ईदनिम्मित बाजार बंद होता. मंगळवारी, 21 ऑगस्टला बाजारात 194 अंशाची वाढ दिसून आली. युरोपियन देशांना कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी, युरोपियन सेंट्रल बॅंकेकडून पावलं उचलण्याबाबत आशादायी वातावरण निर्माण झाल्यामुळे मंगळवारी बाजार वधारला होता. मात्र, बुधवारी, 22 ऑगस्टला तेजी कायम राह्यली नाही. युरो झोन कर्ज संकट मिटवण्यासाठी उचलण्यात येणा-या पावलांबाबत गुंतवणुकदार साशंक झाल्यामुळे बुधवारी बाजार 38 अंशांनी घसरला. गुरुवार, 23 ऑगस्टला बाजारात किंचीत 3 अंशांची वाढ दिसून आली. अमेरिका आणि चीनकडून चलनविषयक धोरण सैल करण्याच्या शक्यतेमुळे गुरुवारी बाजार काहीसा सकारात्मक होता. शुक्रवारी, 24 ऑगस्टला बाजारात उत्साह दिसून आला नाही. चलनविषयक धोरण सैल करण्याच्या शक्यतेवर अमेरिकी फेडरल बॅंकेनं पाणी फिरवल्यामुळे शुक्रवारी बाजार 67 अंशांनी घसरला.